Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सांगली : मुले चोरणारी टोळी समजून 4 साधूंना बेदम मारहाण, 6 जणांना अटक

sangli sadhu
, बुधवार, 14 सप्टेंबर 2022 (13:54 IST)
मुले चोरणारी टोळी समजून 4 साधूंना बेदम मारहाण करण्यात आल्याचा प्रकार सांगलीच्या लवंगा येथे समोर आला आहे. या मारहाणीचा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
 
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यामुळे अनुचित प्रकार टाळण्यात पोलिसांना यश आलं. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून एकूण 6 जणांना अटक केल्याची माहिती सांगलीचे पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी दिली आहे.
 
नेमकं काय घडलं?
उमदी पोलीस ठाण्यात कार्यरत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, "उत्तर प्रदेशातील मथुरा येथे वास्तव्याला असलेले 4 साधून देवदर्शनानिमित्त विजापूर येथे आले होते.
 
विजापूरहून पंढरपूरकडे जाण्यासाठी ते विजयपूर-पंढरपूर मार्गावरून आपल्या खासगी चारचाकी वाहनातून प्रवास करत होते.
 
कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवर असलेल्या लवंगा या गावात साधूंनी प्रवेश केला. याठिकाणी साधूंनी एका शालेय विद्यार्थ्याला पंढरपूरकडे जाणाऱ्या रस्त्याबाबत विचारलं.
 
मात्र, यादरम्यान काही ग्रामस्थांना त्यांच्याविषयी संशय आला. यानंतर ग्रामस्थांनी त्यांच्याकडे चौकशी सुरू केली. पण त्याचं रुपांतर वादात झालं.
 
यादरम्यान, हे साधू म्हणजे मुले चोरणारी टोळी असल्याचा गैरसमज गावकऱ्यांना झाला. त्यामुळे त्यांनी चारही साधूंना वाहनाबाहेर ओढून बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली.
 
स्थानिक नागरिकांनी साधूंना एका ठिकाणी बसवून त्यांचे व्हीडिओही काढले. दरम्यान, आजूबाजूचे गावकरी कन्नड भाषेत काही चर्चा करताना या व्हीडिओमध्ये दिसून येतं. हे सर्व व्हीडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
 
या घटनेची माहिती मिळताच उमदी पोलीस ठाण्यातील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी चारही साधूंना गावकऱ्यांच्या तावडीतून सोडवून पोलीस ठाण्यात आणलं.
 
साधूंची अधिक माहिती मिळवण्यासाठी त्यांचे आधार कार्ड तपासण्यात आले. तसंच त्यांच्या नातेवाईकांशीही संपर्क साधण्यात आला.
 
सखोल चौकशीनंतर संबंधित साधू हे मुले चोरणारी टोळी नाहीत याची खात्री पोलिसांना पटली. हे सर्व साधू मथुरा येथील पंचनाम जुना आखाडा येथील खरे साधू आहेत, हे तपासात निष्पन्न झालं.
 
पण, या मारहाणीबाबत "आपली कोणतीही तक्रार नसल्याचं साधूंनी पोलिसांना सांगितलं. शिवाय, तसा जबाबही त्यांनी पोलिसांना दिला. केवळ गैरसमजातून हा सगळा प्रकार घडल्याचं साधू आणि ग्रामस्थांनी पोलिसांना सांगितलं," अशी माहिती उमदी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी या प्रकरणानंतर दिली.
 
दोन वर्षांपूर्वी लॉकडाऊनच्या काळात पालघर जिल्ह्यामध्ये साधूंना चोर समजून मारहाण करण्यात आल्याचा प्रकार घडला होता. या मारहाणीनंतर साधूंचा मृत्यू झाला होता.
 
हा प्रकार अजूनही विस्मरणात गेलेला नसताना पालघर प्रकरणाशी साधर्म्य असलेला प्रकार सांगली जिल्ह्यात घडल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने सुदैवाने जिवितहानी टळली. पण हे प्रकरण समोर आल्यानंतर यावर राज्यभरातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे.
 
पोलिसांनी दखल घेतली- दीक्षित गेडाम, पोलीस अधीक्षक, सांगली
 
या प्रकरणात साधूंची तक्रार दाखल करण्याची मानसिकता नसली तरी पोलिसांनी या घटनेची दखल घेतली आहे. या प्रकरणी पोलिसांनी उमदी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे, अशी माहिती सांगलीचे पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी दिली आहे.
 
यासंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत माहिती देताना गेडाम म्हणाले, "मारहाण झालेल्या साधूंवर औषधोपचार करण्यात आल्यानंतर त्यांच्याशी पोलिसांनी चर्चा केली. गैरसमजुतीतून हा प्रकार घडला आहे.
 
"मारहाण झालेल्या साधूंची तक्रार दाखल करण्याची मानसिकता नव्हती. तरीही पोलिसांनी दखल घेऊन या घटनेबाबत गुन्हा नोंद केला. या प्रकरणात 6 जणांना अटक करण्यात आली आहे. तसंच गावात सध्या शांततेचं वातावरण आहे," असंही गेडाम यांनी सांगितलं.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मैत्रिणीला मृत पाहून दुसरीनं मारली 5 व्या मजल्यावरून उडी