गडचिरोलीतील अहेरी तालुक्यातील कल्लेडच्या जंगलात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. यात सात नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. मृतांमध्ये पाच पुरुष आणि दोन महिला नक्षलवाद्यांचा समावेश असून घटनास्थळावरुन शस्त्रसाठा आणि नक्षली साहित्य जप्त करण्यात आले आहे.
दोन वर्षांपासून नक्षलवादी कारवाया थंडावल्या असा दावा पोलिसांकडून केला जात असताना गडचिरोलीत गेल्या काही दिवसांपासून नक्षलवादी संघटना सक्रीय झाल्या आहेत. गेल्या १५ दिवसांमध्ये सात जणांची नक्षलवाद्यांनी हत्या केली होती. खबरी ठरवून ग्रामस्थांची हत्या करण्याचे प्रकार सुरु असतानाच दुसरीकडे सुरक्षा दलांनाही नक्षलवाद्यांनी लक्ष्य केल्याचे प्रकार समोर आले होते. भूसुरुंग स्फोटाच्या घटनेसोबतच चकमकीचे प्रकारही वाढत होते. त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्न उपस्थित झाले होते. या पार्श्वभूमीवर बुधवारी पोलिसांना मोठे यश मिळाले.