Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या अपघाती मृत्यूप्रकरणी खूनाचा गुन्हा दाखल

crime
राजापूर , शुक्रवार, 10 फेब्रुवारी 2023 (07:54 IST)
पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या अपघाती मृत्यूप्रकरणी पोलिसांच्या ताब्यात असलेला थार चालक पंढरीनाथ आंबेरकर याच्यावर आता भादंवि कलम 302 अन्वये खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती राजापूर पोलिसांनी दिली.
 
राजापूर तालुक्यातील कशेळी येथील रहिवासी शशिकांत वारीशे हे सोमवारी दुपारी 1 च्या सुमारास राजापूर पेट्रोल पंपातून आपल्या दुचाकीमध्ये पेट्रोल भरून बाहेर पडत असताना समोरून भरधाव वेगात येणाऱया महिंद्रा थार या गाडीने दुचाकीला समोरून जोरदार धडक दिली होती. या अपघातात वारीशे हे गंभीर जखमी झाले होते. दरम्यान त्यांच्यावर कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु असताना मंगळवारी सकाळी त्यांचे निधन झाले होते. या अपघातात मृत्यूमुखी पडलेले पत्रकार वारीशे यांचे मेहुणे अरविंद दामोदर नागले यानी राजापूर पोलिसात थार गाडीचा चालक आंबेरकर याच्याविरोधात फिर्याद दाखल केली होती.
 
त्यानुसार पोलिसांनी आंबेरकर याच्याविरोधात भादंवि कलम 308 व 304 अन्वये गुन्हा दाखल करून अटक केली होती. मंगळवारी आंबेरकर याला न्यायालयात हजर केल्यानंतर 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून आंबेरकर सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. दरम्यान या अपघाती मृत्यूबाबत संशयाचे वातावरण पसरले होते. त्यामुळे अपघातास कारणीभूत ठरलेल्या आंबेरकर याच्याविरुध्द भादंवि कलम 302 अन्वये कारवाई करण्याची मागणी वाढत होती. अखेर आंबेरकर याच्यावर भादंवि कलम 302 दाखल केल्याची माहिती राजापूर पोलिसांनी दिली.
Edited by : Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

एक जरी आरोप खरा ठरला तर आमदारकिचा राजीनामा देईन-हसन मुश्रीफ