जुगाड करणारे शेतकरीपुत्र आपण नेहमीच सोशल मीडियावर बघत असतो. परंतु जळगावमधल्या एका शेतक-याच्या मुलाने अशा पावडरचे संशोधन केले आहे, ज्यामुळे तब्बल दोन महिने शेतीला पाण्याची गरज भासणार नाही. राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी या शेतकरीपुत्राची दखल घेतली आहे.
जळगाव जिल्ह्यातील शेतकरी पुत्र व मेकॅनिकल इंजिनीअर असलेल्या सुनील पवार या तरुणाने शेती क्षेत्रात अत्यंत प्रभावी असे संशोधन करून एक विशिष्ट जैविक पावडर उत्पादित केली आहे. ही पावडर पेरणीच्या वेळी बियाणासोबत मिश्रण करून दिल्यानंतर पिकाला दीड ते दोन महिने पाण्याची गरज लागत नाही, असा दावा सुनील पवार यांनी केला आहे. या पावडरचे पेटंट देखील सुनील पवार यांनी नोंद केले आहे.
सुनील पवार यांच्या संशोधनाची राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दखल घेतली आहे. पवार यांच्याशी मुंडेंनी दूरध्वनीवरून संपर्क साधून चर्चा केली. कृषि विद्यापीठातील तज्ज्ञांची एक टीम पुढील आठवड्यात सुनील पवार यांनी संशोधन केलेल्या या पावडरचा व त्यांनी वापर केलेल्या शेतीचा अभ्यास करण्यासाठी जळगाव जिल्ह्यात जाणार आहे.
मका व अनेक दिवस पाणी आपल्यात साठवून ठेवण्याची क्षमता असलेल्या अन्य काही जैविक घटकांना एकत्र करून ही जैविक पावडर बनवण्यात आली आहे. यामुळे दीड ते दोन महिने पाणी साठवून ठेवण्याची क्षमता या पावडरमध्ये आहे. कमी पावसाच्या किंवा दुष्काळी भागात ही पावडर शेतीला वरदान देणारी ठरणार असल्याचा दावा सुनील पवार यांनी केला आहे.
पावडर हे एक प्रकारचे वरदान
सदरील प्रयोग पूर्णपणे जर यशस्वी झाला तर शेतीक्षेत्रात क्रांती घडू शकते. तसेच दुष्काळी व अवर्षणग्रस्त भागात देखील ही पावडर एक प्रकारचे वरदान ठरणार आहे. म्हणूनच चाळीसगाव येथे आम्ही लवकरच कृषि विद्यापीठाच्या तज्ज्ञांची एक टीम सुनील पवार यांच्या भेटीला पाठवत आहोत. या टीमचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील निर्णय घेऊ, असे मत कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले आहे.
Edited By - Ratnadeep ranshoor