महाराष्ट्रातील29 महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने महत्त्वाचा निर्णय घेतला असून, 13 जानेवारी संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते 16 जानेवारीपर्यंत संबंधित सर्व महापालिका क्षेत्रात ड्राय डे लागू करण्यात आला आहे.येत्या 15जानेवारी रोजी मतदान होणार असून, निवडणूक प्रक्रिया शांततेत आणि पारदर्शकपणे पार पडावी, यासाठी हा निर्णय घेतला आहे.
महापालिका निवडणुका शांततेत पार पडाव्यात आणि मतदार निर्भयपणे मतदान करू शकावेत, यासाठी पुढील चार दिवस राज्यातील संबंधित महानगरपालिका क्षेत्रात ड्राय डे काटेकोरपणे राबवला जाणार आहे.
महापालिका निवडणुकांचा प्रचार आज 13 जानेवरी रोजी संध्याकाळी 5 वाजता संपणार आहे. कोणत्याही प्रकारचे आमिष, गैरप्रकार किंवा मतदारांवर प्रभाव नको पडायला या साठी मद्यविक्रीवर बंदी घेतली असून चार दिवसांचा ड्राय डे जाहीर करण्यात आला आहे.
राज्यातील मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर यांसह एकूण 29 महानगरपालिकांच्या हद्दीत पुढील चार दिवस दारूची दुकाने, बार आणि मद्यविक्री केंद्रे बंद ठेवण्यात येणार आहेत. ज्या ठिकाणी निवडणुका होत आहेत, त्या सर्व भागांत हा नियम लागू राहणार आहे.
या निर्णयाबाबत मद्यविक्री करणाऱ्या दुकानदारांना व व्यावसायिकांना आधीच सूचना देण्यात आल्या आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही प्रशासनाकडून देण्यात आला आहे.