Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शिर्डीच्या साई संस्थांनने साकारले भव्य शैक्षणिक संकुल; पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार उदघाटन

शिर्डीच्या साई संस्थांनने साकारले भव्य शैक्षणिक संकुल; पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार उदघाटन
, शनिवार, 17 डिसेंबर 2022 (21:58 IST)
शिर्डी  –पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जिल्ह्यातील व शिर्डी येथील विविध प्रकल्पांच्या उद्घाटनासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आमंत्रण ‍दिले आहे. पंतप्रधानाच्या शिर्डी येथील संभाव्य दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्र्यांनी आज श्री साईबाबा शैक्षणिक संकुलाच्या नवीन इमारतीची पाहणी केली. विविध विकासकामांबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची काल पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी नवी दिल्ली येथे खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांच्यासोबत भेट घेतली. त्यावेळी त्यांनी उत्तर अहमदनगर जिल्ह्याच्या जिरायती भागाला वरदान ठरणाऱ्या निळवंडे धरण लोकार्पण, शिर्डी साईबाबा विश्वस्त व्यवस्थापन समितीने भाविकांच्या दर्शनासाठी नव्याने निर्माण केलेली दर्शन रांग व श्री साईबाबा शैक्षणिक संकुलाच्या नवीन इमारतीचे उद्घाटनास येण्याचे आमंत्रण दिले. या आमंत्रणास पंतप्रधानांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे‌. या पार्श्वभूमीवर पालकमंत्र्यांनी शिर्डी येथे पाहणी दौरा केला.
 
श्री‌ साईबाबा शैक्षणिक संकुलाच्या नवीन इमारतीची पाहणीवेळी श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल जाधव, प्रांताधिकारी गोविंद शिंदे, तहसीलदार कुंदन हिरे आदी अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार आवश्यक शैक्षणिक सुविधा, शेती महामंडळाच्या जागेवर खेळण्यासाठी अद्यावत मैदान उभारण्यात यावे, शैक्षणिक संकुलातील मोकळ्या जागेत सौंदर्यस्थळे विकसित करून सुशोभीकरण करण्यात यावे, शैक्षणिक संकुलाकडे येणाऱ्या रस्त्याचे रुंदीकरण करण्यात यावे अशा
सूचना पालकमंत्र्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.
 
श्री साईबाबा समाधीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी मंदीर सभागृहात त्यांनी पत्रकारांशी विविध विषयावर चर्चा केली. त्यावेळी महसूलमंत्री श्री.विखे पाटील म्हणाले, शिर्डी संस्थान द्वारे १०९ कोटी रुपयांच्या निधीतून विकसित करण्यात आलेले दर्शन रांगेचे १२ हॉल आणि २१८ कोटी रुपयांच्या निधीतून विकसित करण्यात आलेल्या एज्युकेशन कॉम्प्लेक्सच्या उद्घाटनासाठी तसेच उत्तर अहमदनगर जिल्ह्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असलेले निळवंडे धरण, शिर्डी विमानतळ येथील नवीन टर्मिनल बिल्डिंग व शेतकरी परिषदेस शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे अशा विविध प्रस्तावित कार्यक्रमांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमंत्रण देण्यात आले आहे. यास आमंत्रणाचा त्यांनी स्विकार केला आहे. फेब्रुवारी किंवा मार्च २०२३ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शिर्डी भेट प्रस्तावित आहे. त्यादृष्टीने शिर्डीतील विविध विकासकामांचा आढावा घेण्यात येत आहे.
 
श्री साईबाबा शैक्षणिक संकुलात केंब्रिज विद्यापीठाच्या धर्तीवर सुविधा विकसित करण्यात याव्यात. देशांतर्गंत उच्च शैक्षणिक सुविधा असलेल्या शैक्षणिक संकुलाची पाहणी करून त्या धर्तीवर याठिकाणी सुविधा असाव्यात. तसेच विद्यार्थ्यांसाठी शेती महामंडळाच्या जागेवर सर्व सोयी-सुविधांसह सुसज्ज मैदान उभारण्यात यावे. त्यासाठी प्रस्ताव तयार करावा. अशा सूचना ही पालकमंत्र्यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.
 
येत्या काळात शिर्डीमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे २ प्रकल्प उभारण्याचा मानस आहे. आयटी पार्क, लॉजीस्टीक हब, आनंदसागरच्या धर्तीवर थीम पॉर्क उभारण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल. जेणेकरून शिर्डी येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकाच्या करमणुकीची सोय होईल. त्यामुळे भाविक याठिकाणी एक दिवस मुक्काम करेल. यातून शिर्डीच्या अर्थकारणाला गती मिळेल. वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी वाहतूक आरखडा तयार करण्यात येईल. ‘नो व्हेईकल झोन’ विकसित करण्यात येईल. असे ही पालकमंत्री श्री.विखे पाटील यांनी यावेळी सांगितले.
Edited by : Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

हॉस्पिटलमध्ये आढळले अवैध सोनोग्राफी मशीन