राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कुटुंबीयांवर केंद्रीय तपास यंत्रणांनी आतापर्यंत 110 धाडी टाकल्या आहेत. एकाच व्यक्तीविरोधात आणि त्याच्या कुटुंबीयांवर इतक्या धाडी पडण्याचा प्रकार आजपर्यंत तुम्ही बघितला आहे का, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी उपस्थित केला.
अनिल देशमुख यांच्या कुटुंबीयांवर ईडीने 50, सीबीआयने 40 आणि प्राप्तीकर खात्याने आतापर्यंत 20 धाडी टाकल्याचा उल्लेखही पवार यांनी केला. तसेच ममता बॅनर्जी यांच्या सल्ल्यानुसार आता विरोधी पक्ष केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईविरोधात एकत्र बसून रणनीती ठरवतील, असेही त्यांनी सांगितले. ते मंगळवारी नवी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात बोलत होते.