देहविक्रीसाठी आणलेल्या दोन पीडित तरुणींची ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने सुटका केली आहे. हे सेक्स रॅकेट चालवणार्या एका दलाल महिलेला याप्रकरणी अटक केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेतना चौधरी यांनी दिली.
ठाण्यातील घोडबंदर रोड, सिनेवंडर मॉलसमोरील सर्विस रोडवर एक महिला दोन तरुणींना देह विक्रीच्या व्यवसायासाठी घेऊन येणार असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाला मिळाली होती. त्याच आधारे 2 एप्रिल रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास या पथकाने बनावट गिर्हाइकांच्या मदतीने सापळा लावला. याच सापळ्यात एका दलाल महिलेला ताब्यात घेतले असून तिच्या तावडीतून दोन पीडित तरुणींची सुटका केली आहे. या महिलेविरुद्ध चितळसर पोलीस ठाण्यात अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियमाखाली गुन्हा दाखल केला आहे. पीडित तरुणींना सुरक्षिततेच्या दृष्टीने चितळसर मानपाडा येथील एका सुरक्षागृहात ठेवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
Edited by -Ratnadeep Ranshoor