मेट्रो ३ च्या कारशेड प्रकल्पाला गती आली असून पुढच्या २४ तासांसाठी आरेचा मार्ग बंद ठेवण्यात आला आहे. दरम्यान, मेट्रो ३ साठीचे दोन डबे लवकरच मुंबईत दाखल होणार असून मरोळ-मरोशी येथील तात्पुरत्या कारशेडमध्ये ते ठेवण्यात येणार आहे. त्यासाठी वृक्षतोड होत असल्याचं समोर येत आहे. यामुळे पर्यावरणप्रेमींनी पुन्हा एकदा नाराजी व्यक्त केली आहे.
आंध्र प्रदेशमधील श्रीसिटी येथील कारखान्यातून मेट्रो गाडी मुंबईत येणार आहे. गाडीचे आठपैकी दोन डबे आठवड्याभरापूर्वी श्रीसिटी येथून रस्ते मार्गे रवाना झाले आहेत. मोठ्या ट्रेलरमधून हे डबे येत असून रस्त्यांवरील झाडांचा डब्यांना अडथळा निर्माण होऊ नये यासाठी वृक्ष छाटणी करण्यात येत असल्याचं म्हटलं जात आहे.
दरम्यानसकाळपासून मरोळ आणि गोरेगाव येथून आरे परिसरात येणाऱ्या रस्त्यांवरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. पुढचे २४ तास ही वाहतूक बंद असेल. यामुळे बेस्ट बसचेही मार्ग वळवण्यात आले आहे.