Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्ते बांधकामाला वेग

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्ते बांधकामाला वेग
नागपूर , मंगळवार, 13 जुलै 2021 (15:59 IST)
सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे हिंगणा रोडवर टीडब्ल्यूटी (अल्ट्रा थीम व्हाईट टॉपिंग) या तंत्रज्ञानाचा वापर करुन पहिल्यांदाच प्रायोगिक तत्त्वावर 180 मी. मी. रस्त्याचे बांधकाम करण्यात येत आहे. या नव्या तंत्रज्ञानामुळे खर्चात बचत होऊन बांधकामाचा अवधी कमी होणार असल्याची माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.
 
टीडब्ल्यूटी या नवीन तंत्रज्ञानाचा वापर करुन हिंगणा टी पॉईंट ते प्रियदर्शनीपर्यंत 13.85 किलो मीटर लांबीचा सिमेंट रस्ता जागतिक बँक प्रकल्प विभागातर्फे बांधण्यात येत आहे. या  नवीन तंत्रज्ञानाची पाहणी नितीन गडकरी यांनी केली. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता विद्याधर सरदेशमुख, कार्यकारी अभियंता सतीश अंभोरे, मुंबईच्या साकेत शहा व पारेख या कंत्राटदार  कंपनीतर्फे राजनारायण जैस्वाल यावेळी उपस्थित होते.
 
अल्ट्रा थीम व्हाईट टॉपिंग (टीडब्ल्यूटी) या तंत्रज्ञानाचा नागपूर येथे पहिल्यांदाच प्रायोगिक तत्त्वावर वापर करण्यात येत आहे. हा रस्ता 13.85 किलो मीटर लांबीचा असून या संपूर्ण रस्त्यावर 128 कोटी 28 लक्ष रुपये खर्च होणार आहे. हा संपूर्ण सिमेंट मार्ग चोवीस महिन्यात पूर्ण करायचा आहे. या रस्त्यावर पातळ काँक्रिटच्या म्हणजेच 180  मी. मी. जाडीचा वापर करण्यात येणार आहे. याला आयआरसीची मान्यता आहे. रस्त्याच्या एकूण खर्चात कशा पद्धतीने बचत करता येईल व नाविन्यपूर्ण पद्धतीने रस्ता बनवता येईल या उद्देशाने  सुरु असलेल्या कामांची माहिती  केंद्रीय मंत्री श्री.गडकरी यांनी घेतली.
 
प्रारंभी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता विद्याधर सरदेशमुख यांनी स्वागत करुन प्रास्ताविक भाषणात नवीन पद्धतीने प्रायोगिक तत्त्वावर बांधण्यात येणाऱ्या या रस्त्यासाठी 163 कोटी 46 लाख रुपये तांत्रिक मान्यता असल्याचे सांगितले. या रस्त्याच्या बांधकामासाठी संबंधित कंत्राटदाराकडून 128 कोटी 28 लक्ष रुपयांचा करारनामा करण्यात आला असून 10 मार्च 2019 रोजी कार्यारंभ आदेश देण्यात आले आहे. या बांधकामासाठी चोवीस महिन्याचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. सप्टेंबर 2021 पर्यंत बांधकाम  करण्याचा कालावधी विहित करण्यात आला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Maharashtra SSC Board Exam Result 2021 दहावीचा निकाल आठवड्याभरात