मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. संजय देशमुख यांना कुलगुरुपदावरुन हटवले आहे. आता सरकारने पुन्हा चूक करु नये आणि या पदावर लायक व्यक्ती नेमावी अशी मागणी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी केली आहे. कुलगुरु जबाबदारीतून मुक्त झाले, पण विद्यार्थ्यांचे जे नुकसान झाले, वर्ष वाया गेले आणि मनस्ताप झाला, त्याची भरपाई सरकार कशी करणार असा सवालही त्यांनी विचारला आहे.
ऑनलाइन मूल्यांकनाच्या निर्णयामुळे वादग्रस्त ठरलेले मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. संजय देशमुख यांची मंगळवारी पदावरुन हकालपट्टी करण्यात आली. अक्षम्य निष्काळजीपणा आणि ऑनस्क्रीन मूल्यांकनाची अंमलबजावणी करण्यात अपयश आल्याचा ठपका ठेवून राज्यपालांनी देशमुख यांना कुलगुरुपदावरुन हटवण्याचा निर्णय घेतला. मुंबई विद्यापीठाच्या १५० वर्षांच्या इतिहासात कुलगुरुंची हकालपट्टी होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
त्यानंतर युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवरुन प्रतिक्रिया दिली आहे.