Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

12 जण ठार झाल्यावर नक्षलवादी म्हणतात, 'अपूर्ण स्वप्न पूर्ण करणार'

12 जण ठार झाल्यावर नक्षलवादी म्हणतात, 'अपूर्ण स्वप्न पूर्ण करणार'
, बुधवार, 14 ऑगस्ट 2024 (09:44 IST)
गडचिरोली-छत्तीसगड सीमेवरील वांडोलीच्या घनदाट जंगलात 17 जुलैला नक्षलवादी आणि पोलिसांमध्ये चकमक झाली होती. यामध्ये 12 नक्षलवादी ठार झाले होते. या घटनेच्या तीन आठवड्यानंतर नक्षलवाद्यांनी एक पत्रक काढून 'अपूर्ण राहिलेलं स्वप्न पूर्ण करणार' असं म्हणत निर्वाणीचा इशारा सरकारला दिला आहे.
 
पश्चिम सब झोनल ब्युरोचा प्रवक्ता श्रीनिवास याने हे पत्रक लिहिलं असून चकमकीत ठार झालेल्या 12 नक्षलवाद्यांची नावंही देण्यात आली आहे.
 
गडचिरोली जिल्ह्यातील नैसर्गिक खनिज संपत्ती देशी-विदेशी कार्पोरेट कंपन्यांच्या घशात घालण्याचा भाजप सरकारचा डाव आहे. इथल्या लोहखनिजावर राज्य सरकारचा डोळा असून कवडीमोल भावात ते कार्पोरेट कंपन्यांच्या घशात घातलं जातंय.
 
तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उद्योगमंत्री उदय सामंत वडलापेठ गावात लोह प्रकल्पाचं उद्घाटन करायला आल्यानं ही चकमक घडवून आणण्यात आली, असाही आरोप या पत्रातून नक्षलवाद्यांनी केला आहे.
 
यात मारल्या गेलेल्या नक्षलवाद्यांचं अपूर्ण स्वप्न आम्ही पूर्ण करणार असल्याचा टोकाचा इशारा या पत्रकातून देण्यात आला आहे.
 
17 जुलैला झाली होती चकमक
गडचिरोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, छत्तीसगड-गडचिरोली सीमेजवळील ऐटापल्ली तालुक्यातल्या वांडोली गावाजवळून बांदे नदी वाहते. तसेच हा भाग घनदाट जंगलात असून इथून पाच ते सहा नाले देखील वाहतात.
 
या भागात मुसळधार पाऊस सुरू असल्यानं नदी-नाले तुडूंब भरून वाहत होते. याच भागात 12-15 नक्षलवादी येत्या 28 जुलै ते 3 ऑगस्ट दरम्यान असलेल्या नक्षल सप्ताहाच्या निमित्तानं विध्वंसक कारवाया करण्याचं नियोजन आखत असल्याची माहिती गडचिरोली पोलिसांना मिळाली होती.
 
यामध्ये कोरची टीपागड आणि चातगाव कसनसूर या संयुक्त दलमचे नक्षलवादी होते. त्यानुसार पोलिसांनी ऑपरेशनची तयारी केली. बुधवारी 17 जुलैला सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास हे ऑपरेशन सुरू करण्यात आलं.
 
सात C-60 पथकांना छत्तीसगड सीमेजवळील वांडोली गावात पाठवलं. या भागात पाऊस सुरू असल्यानं ऑपरेशनमध्ये अडचणी येत होत्या. जंगलात दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांनी अचानक पोलिसांच्या दिशेनं गोळीबार सुरू केला. शस्त्र खाली ठेवून शरण येण्याचं आवाहन पोलिसांनी केलं. पण, नक्षलवाद्यांनी आणखी जोरदार हल्ला केला. त्यावेळी जवानांनी प्रत्युत्तर दिलं.
 
पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये तब्बल सहा तास ही चकमक सुरू होती. चकमकीनंतर जंगलात सी-60 पथकानं शोधमोहीम राबवली असता इथं 12 नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडल्याचं गडचिरोली पोलिसांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. यामध्ये 7 पुरुष तर 5 महिला नक्षलवाद्यांचा समावेश होता.
 
पण, आधी पोलिसांनी गोळीबार सुरू केल्याचा आरोप नक्षलवाद्यांनी त्यांच्या पत्रकात केला आहे. तसेच या मारल्या गेलेल्या नक्षलवाद्यांवर सन्मानपूर्वक अत्यंसंस्कार करावे असंही त्यांनी या पत्रकातून म्हटलं आहे.
 
एकूण 86 लाखांचं होतं बक्षीस
चकमकीत ठार झालेल्या नक्षलवाद्यांमध्ये चातगाव-कसनसूर दलमचा विभागीय समिती सदस्य योगेश दावसिंग तुलावी, कोरची टीपागड दलमचे विभागीय समिती सदस्य विशाल कुल्ले आत्राम आणि प्रमोद लालसाय कलचामी हे वरिष्ठ कॅडरचे नक्षलवादी असून त्यांच्यावर चकमक, जाळपोळ, खून असे गुन्हे दाखल होते. तसेच या तिघांवरही प्रत्येकी 16 लाख रुपयांचं बक्षीस होतं.
 
याशिवाय महारु धोबी गावडे, अनिल देवसाय, सरिता जारा परसा, रज्जो मंगलसिंग गावडे, सीता हवके हे 5 गडचिरोलीचे नक्षलवादी ठार झाले असून त्यांच्यावरही जाळपोळ, चकमक आणि खूनाचे गुन्हे दाखल होते.
 
तसेच रोजा, सागर, चंदा पोड्याम आणि विज्जू हे छत्तीसगडमध्ये बस्तरचे असून त्यांच्यावर कोणते गुन्हे दाखल होते ही माहिती अद्याप मिळालेली नाही असं पोलिसांनी सांगितलं.
 
या सर्व ठार झालेल्या नक्षलवाद्यांवर 86 लाख रुपयांचं बक्षीस होतं.
 
घटनास्थळावरून काय जप्त केलं?
या चकमकीनंतर पोलिसांनी घटनास्थळावर 11 अग्नीशस्त्रांसह तीन AK 47, दोन रायफल, एक कार्बाईन रायफल, एक एसएलआर रायफल, स्फोटके, डेटोनेटर इत्यादी साहित्य जप्त करण्यात करण्यात आलं.
 
देवेंद्र फडणवीसांनी जाहीर केलं बक्षीस
राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली पोलिसांचं अभिनंदन करत या कामगिरीसाठी त्यांना 51 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं होतं.
 
ते नागपुरात माध्यमांसोबत बोलताना म्हणाले, 'गडचिरोली पोलिसांनी 12 नक्षलवाद्यांना ठार केलं आहे. मी त्यावेळी गडचिरोलीत होतो तेव्हा पोलीस अधिक्षकांनी मला याची माहिती दिली होती.'
 
त्यानंतर रात्रीपर्यंत हे ऑपरेशन चाललं. गेल्या काही वर्षांतलं हे सर्वांत मोठं ऑपरेशन होतं, असा दावा गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केला.
 
गडचिरोली जिल्हा नक्षलमुक्त करण्याचा निर्धार- मुख्यमंत्री
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गडचिरोली पोलिसांचं अभिनंदन केलं होतं. ‘ही कारवाई गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलवादी हालचालींवर निर्णायक आघात ठरणारी असून विकासाला प्राधान्य देऊन हिंसाचाराला ठाम विरोध करणे असे आमचे धोरण आहे.
 
गडचिरोली जिल्हा नक्षलमुक्त करण्याचा आमचा निर्धार असल्याचं मुख्यमंत्री शिंदे माध्यमांसोबत बोलताना म्हणाले.
 
C 60 पथक म्हणजे काय?
गडचिरोली पोलिसांच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, आधी चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्हा एकत्रच होता. तेव्हापासूनच नक्षली चळवळ सक्रीय होती. गडचिरोली जिल्ह्याचं विभाजन झाल्यानंतर नक्षली कारवायांमध्ये अधिक वाढ झाली.
 
त्यामुळे नक्षली कारवायांवर प्रतिबंध घालण्यासाठी 12 जानेवारी 1990 ला सी 60 पथकाची स्थापना करण्यात आली. गडचिरोलीचे तत्कालीन पोलीस अधीक्षक के. पी. रघुवंशी यांनी या पथकाची स्थापना केली.
 
या पथकात सुरुवातीला फक्त 60 सक्षण आणि विशेष कमांडो होते. त्यामुळे याला सी-60 म्हटलं गेलं. या पथकाचे पहिले प्रभारी एस. व्ही. गुजर होते.
 
नक्षली कारवाया दक्षिण गडचिरोली भागात जास्त असल्यानं प्राणहिता उपमुख्यालयात 1994 साली सी 60 पथकाच्या दुसऱ्या मुख्यालयाची स्थापन करण्यात आली. याच सी 60 पथकाला याआधी क्रॅक कमांडो नावानं सुद्धा ओळखलं जायचं.
 
फक्त नक्षलवाद्यांचा सामनाच नाहीतर हे जवान इतर शासकीय कर्मचाऱ्यांचं काम देखील करतात. नक्षलग्रस्त भागात इतर शासकीय कर्मचारी जायला तयार नसतात अशावेळी हे सी-60 पथक गावात जाऊन नागरिकांसोबत संवाद साधतात आणि ती माहिती संबंधित अधिकाऱ्यांना सांगतात.
 
याआधीही एटापल्ली तालुक्यात झाली होती मोठी चकमक
एटापल्ली तालुक्यात नक्षली कारवाया अधूनमधून सुरूच असतात. घनदाट जंगलाचा भाग असल्यानं या भागात नक्षील कारवाया जास्त आहेत.
 
एटापल्ली तालुक्यात 2021 ला पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली होती. पयडी-कोटमी जंगलात असलेल्या पयडी गावात नक्षलवादी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी गावाला घेराव घातला होता.
 
यावेळी गडचिरोली पोलिसांचं सी-60 पथक आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली होती. यात 13 नक्षलवादी ठार होते. यात 6 पुरुष, तर 7 महिला नक्षलवाद्यांचा समावेश होता.
 
'चकमक आणि उपमुख्यमंत्र्यांचे कार्यक्रम याचा संबंध नाही'
गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार लोहप्रकल्पाच्या भूमिपूजनाला त्यामुळे ही चकमच घडवून आणली असा आरोप नक्षलवाद्यांनी केला. हा कार्यक्रम मंत्री धर्माराव बाबा आत्राम यांच्या पुढाकाराने झाला होता. त्यामुळे आम्ही धर्माराव बाबा आत्राम यांची बाजू जाणून घेतली.
 
ते बीबीसी मराठीसोबत बोलताना म्हणाले, ‘’वडलापेठमधल्या लोह प्रकल्पाचं भूमिपूजन आधीपासूनच ठरलं होतं. वांडोला इथली चकमक योगायोगानं झाली. हा परिसरात वडलापेठपासून 70 किलोमीटर दूर आहे. इतक्या दूर कोणी नियोजन करून चकमच घडवून आणतं का? पोलीस आणि नक्षलवाद्यांनी एकमेकांवर गोळीबार केला. त्यामधून ही चकमक झाली. याचा वडलापेठ इथं दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या भूमिपूजनासोबत काहीही संबंध नाही.’’
 
तसेच गडचिरोलीतलं लोहखनिज कार्पोरेट कंपन्यांच्या घशात घालण्याचा सरकारचा डाव असल्याचा आरोपही नक्षलवाद्यांनी या पत्रकातून केला आहे.
 
यावर धर्माराव बाबा आत्राम म्हणाले, "आम्ही सूरजागड लोह प्रकल्पातून 260 कोटी रुपयांची रॉयल्टी मिळतेय. त्यामधून गडचिरोली जिल्ह्याचा विकास होतोय. सूरजागड मायनिंगमधून 260 कोटी रुपये रॉयल्टी मिळाली आहे. त्यामधून दवाखाना, ग्रामपंचायतचे काम सुरू आहे.
 
"सरकारकडून येणारा निधी आम्हाला वेगळ्या कामांमध्ये खर्च करता येईल. दोन ते तीन वर्षांत हजार कोटीपर्यंत रॉयल्टी येईल. हा पैसा डीपीसीच्या रकमेपेक्षा तीन पैसा आहे. यामधून गडचिरोलीचा विकास होतोय," असं धर्मराव बाबा आत्राम यांनी म्हटलं आहे.

Published By- Dhanashri Naik 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आसाम सरकारचा निर्णय, आता मृत सरकारी कर्मचाऱ्यांच्या पालकांनाही 20 टक्के अनुकंपा अनुदान मिळणार