Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सासूच्या निधनानंतर सुनेने दिला मुखाग्नी अस्थिरक्षेवर केले वृक्षारोपण

सासूच्या निधनानंतर सुनेने दिला मुखाग्नी अस्थिरक्षेवर केले वृक्षारोपण
कराळा , मंगळवार, 26 नोव्हेंबर 2019 (11:05 IST)
शहरातील घोलपनगर भागात वास्तव्यास असणार्‍या सेवानिवृत्त मुख्याध्यापिका रामकुंवर अब्दुले (वय 78) यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबाने वेगळेपणा जोपासत परंपरागत काही प्रथांना बाजूला सारले. तसेच या निमित्ताने स्त्री-पुरुष समानता, पर्यावरण संवर्धन, समाज बांधिलकी या बाबीला प्राधान्य दिल्याचे दिसून
आले आहे.
 
अब्दुले यांच्या अंतिम संस्कारावेळी मुलाने मुखाग्नी देण्याच्या परंपरेला छेद दिला गेला. याप्रसंगी पती सेवानिवृत्त मुख्याध्यापक मुरलीधर अब्दुले, मुलगा गांधी विद्यालयातील शिक्षक सचिन अब्दुले या घरातील कर्त्या पुरुषांऐवजी त्यांच्या सून अश्विनी यांनी हा अग्नी दिला. अश्विनी यांनी अब्दुले यांच्या आजारपणात त्यांची मनोभावे सेवा केली होती.
 
अंतिम संस्कारानंतर अस्थिरक्षेचे विसर्जन नदी, तलाव अशा ठिकाणी करण्याची जुनी प्रथा आहे. या प्रथेलाही अब्दुले परिवाराने छेद दिला. कोणत्याही जलस्रोतांमध्ये अस्थिरक्षा विसर्जन करुन जलप्रदूषण करण्याऐवजी
संगोबा मार्गावरील शेतात खड्डा घेवून त्यात रक्षा विसर्जित करुन त्यावरच आंब्याच्या झाडाचे रोपण करण्याला अब्दुले परिवाराने प्राधान्य दिले. मुख्याध्यापिका अब्दुले या पर्यावरणप्रेमी होत्या. याशिवाय त्यांना शेतीची मोठी आवड असल्याने झाडाच्या माध्यमातून त्यांच्या आठवणी कायम ठेवण्याचा प्रयत्न अब्दुले
परिवाराने केला आहे.
 
दरम्यान निधनानंतर वेगवेगळे विधी करण्याची प्रथाही समाजामध्ये आहे. मात्र अब्दुले परिवाराने अशा विधींनाही फाटा दिला. त्या अनुषंगाने होणारा संभाव्य खर्च समाज विकासासाठी उपयोगात येण्याच्या हेतूने परिवाराने पाच हजार रुपयांची देणगी सामाजिक जागृती कार्यासाठी दिली आहे. याप्रसंगी मुरलीधर अब्दुले, सचिन अब्दुले, अश्विनी अब्दुले, माधुरी कांबळे, ज्ञानदेव कांबळे, नामदेव घोगरे आदी उपस्थित होते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

महाराष्ट्र LIVE: 27 नोव्हेंबरला बहुमत चाचणी, सुप्रीम कोर्टाचे आदेश