Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अजित पवार की सुप्रिया सुळे? राष्ट्रवादी काँग्रेसचा पुढचा अध्यक्ष कोण? पक्षाचं भवितव्य काय?

sharad pawar ajit pawar
, मंगळवार, 2 मे 2023 (19:08 IST)
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाचं अध्यक्षपद सोडणार असल्याचं जाहीर केलं आहे. त्यांच्या निर्णयामुळे मोठी खळबळ उडाली असून राजीनामा मागे घ्यावा या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना सांगितलं की साहेब राजीनामा मागे घेणार नाहीत आणि योग्य तो निर्णय घेतील. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसचा पुढचा अध्यक्ष कोण असेल याविषयी आम्ही काही तज्ज्ञांशी चर्चा केली.
 
1999 साली काँग्रेसपासून वेगळे होत शरद पवार, तारिक अन्वर, आणि पी.ए. संगमा यांनी मिळून राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली होती. तेव्हापासून आजतागायत शरद पवारच काँग्रेसचे अध्यक्ष आहेत.
 
त्यामुळे त्यांचा वारसा कोण चालवणार या प्रश्नाला उत्तर देताना ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे म्हणाले, “अजित पवार यांनी वारंवार सांगितलं आहे की त्यांना राज्याच्या राजकारणात जास्त रस आहे. त्यामुळे त्यांना पक्षाच्या अध्यक्षपदात त्यांना रस नाही. त्यामुळे सुप्रिया सुळे पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष होतील. कारण एका मर्यादेपलीकडे त्यांनाही राज्याच्या राजकारणात फारसा रस नाही. त्या त्यांच्या संसदेच्या आणि राष्ट्रीय कामात खूश आहेत. त्यामुळे त्याच अध्यक्ष होतील असं मला वाटतं.”
 
राजकीय विश्लेषक हेमंत देसाई यांनीही चोरमारे यांच्या सुरात सूर मिसळला. “अजित पवार अध्यक्ष होणं कठीण आहे. कारण तसं झालं तर त्यांना त्यांचा सूर बदलावा लागेल. गेल्या काही काळापासून अजित पवार भाजपवर अजिबात टीका करताना दिसत नाही. तसंच शरद पवारांचा जितका प्रभाव आहे तितका प्रभाव अजित दादांचा नाही. त्यामुळे शरद पवारांच्या विचारांचा वारसा सुप्रिया सुळेच चालवतील असं मला वाटतं.”
बीबीसी मराठीच्या शोमध्ये बोलताना ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी वेगळं मत मांडलं. त्यांच्या मते अजित पवार हेच पक्षात नंबर 1 आहेत. काकांनी निवृत्त व्हावं ही अजित पवारांचीच इच्छा आहे. त्यामुळे अजित पवारच पक्षाचे अध्यक्ष होतील.
 
राजीनाम्याच्या घोषणेनंतर कार्यकर्त्यांना शांत करण्यात प्रसंगी त्यांना आक्रमकपणे समजावण्यात अजित पवार यांनी पुढाकार घेतला होता. तरी चोरमारे यांच्या मते पालकत्वाच्या भूमिकेतून त्यांनी कार्यकर्त्यांना समजावण्याची भूमिका घेतली.
 
शरद पवार यांची राजकीय कारकीर्द जवळून पाहिलेल्या ज्येष्ठ पत्रकार सुरेश भटेवरा यांनी एक वेगळीच भूमिका मांडली. त्यांच्या मते अदानी यांच्याबद्दल सकारात्मक मत व्यक्त केल्यामुळे शरद पवारांवर टीका झाली. त्यामुळे ते कुठे पक्षाच्या आड येऊ नये म्हणून त्यांनी राजीनामा दिला. त्यांच्या मते अजित पवार आणि सुप्रिया सुळे दोघंही अध्यक्ष होणार नाही.
 
भटेवरा यांच्या मते श्रीनिवास पाटील पुढचे अध्यक्ष होऊ शकतात कारण त्यांनी अनेक संवैधानिक पदं भूषवली आहेत, त्यांच्याकडे राजकारण आणि प्रशासनाचा मोठा अनुभव आहे. त्यामुळे ते या पदाला योग्य आहे असं मला वाटतं.
 
आत्ताच निवृत्ती का?
 
शरद पवारांनी आत्ताच राजीनामा का दिला हाही कळीचा प्रश्न या निमित्ताने उद्भवला आहे. हेमंत देसाई यांच्या मते त्यांची प्रकृती आणि वय पाहता आता राजीनामा देणं सयुक्तिक आहे.
 
पुणे लोकमतचे संपादक संजय आवटे म्हणतात, “2014 च्या लोकसभा निवडणुकीने सगळे संदर्भच बदलून टाकले. जन्मापासून सत्तेचा चमचा तोंडात असलेली राष्ट्रवादी कॉंग्रेस सत्तेतून बाहेर गेली. देशात कॉंग्रेसची वाताहत झाली. राज्यातही स्थिती बिकट झाली. तरीही नव्या राजकारणात 'रिलिव्हंट' राहण्याचा प्रयत्न पवार करत राहिले.
 
त्यांचे गुरू यशवंतराव चव्हाण यांच्या अखेरच्या दुर्दैवी कालखंडाने पवारांना बरेच काही शिकवले आहे. ज्या इंदिरा गांधींना यशवंतरावांनी विरोध केला, त्या इंदिरा पुन्हा सत्तेत आल्या आणि यशवंतरावांचे राजकीय करीअरच संपुष्टात आलं. सोनियांना विरोध करणाऱ्या पवारांचे असं झालं नाही, यात सोनियांकडे असलेले कमी राजकीय भांडवल आणि सोनियांचा चांगुलपणा ही कारणे आहेतच. पण, पवारांचं सावधपणही आहे. संदर्भ कितीही बदलोत, आपण 'रिलिव्हंट' राहायचे हे पवारांना नीट कळलेलं आहे.
 
कॉंग्रेससारख्या बलाढ्य पक्षाला आव्हान देऊन स्वतःचा पक्ष स्थापन केल्यानंतर कर्करोगासारख्या असाध्य आजाराने गाठूनही उभे राहिलेले पवार हे रसायन अजिबातच सामान्य नाही. तरीही, 2019च्या लोकसभा निवडणुकीने चित्र बदललं. शरद पवार संपल्याच्या चर्चांना उधाण आलं. पवारांना सोडून लोक भाजपमध्ये जाऊ लागले.
 
त्याही स्थितीत पवार डगमगले नाहीत. ते बाहेर पडले. 'इडी'वर चालून गेले. पावसात भिजले. अशक्य ते पवारांनी करून दाखवले. "
 
अजित पवार सर्व सूत्र हातात घेण्यास तयार?
शरद पवार यांनी त्यांच्या निवृत्तीची घोषणा करताच सभागृहात एकच कल्लोळ सुरू झाला. त्या सर्व गडबडीत अजित पवार यांची देहबोली आणि भाषा मात्र सर्व सूत्र हातात घेण्याच्या तयारीत असल्याचं दिसून आली.
 
सुप्रिया सुळे यांना बोलण्यापासून रोखणं, कार्यकर्त्यांना खाली बसलणे. कार्यकर्त्यांना दरडावणं त्यांना शांत करणं, अशा आवेशात अजित पवार इथं वावरत होते.
 
त्याचवेळी त्यांची काही वाक्य ही भूवया उंचावणारीसुद्धा होती.
 
“काळानुरूप काही निर्णय घ्यावे लागतात आणि साहेबांच्या डोळ्यादेखत नवा अध्यक्ष तयार झाला तर तुम्हाला का नको रे? मला काही कळत नाही तुमचं…,” असं दरडावणाऱ्या भाषेत अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना सुनावलं.
 
शिवाय बोलता बोलता त्यांनी हा निर्णय आधी झाला आहे तेसुद्धा सांगून टाकलं.
 
“हा प्रसंग कधी ना कधी येणार होता. कालच ते 1 मेला जाहीर करणार होते, पण काल वज्रमुठ सभा होती. म्हणून आजची 2 तारीख ठरली. त्यांनी त्यांचा निर्णय जाहीर केला आहे. त्यांच्या मनात आहेत त्याच गोष्टी आपण करू. त्यांच्या मनाच्या बाहेर यत्किंचित कुठली गोष्ट होणार नाही,” असं पुढे त्यांनी स्पष्ट करून टाकलं.
 
या संपूर्ण प्रकरणात लो प्रोफाईल दिल्या त्या सुप्रिया सुळे. कॅमेराच्या एँगलमध्ये थेट येणार नाही अशी जागा पकडून त्या कार्यकर्त्यांमध्ये बसल्या.
 
त्यांना बोलण्याचा आग्रह झाला तेव्हासुद्धा त्या टाळताना दिसून आल्या. त्यांनी बोलावं अशी त्यांच्या आईंचीसुद्धा इच्छा दिसत नव्हती. त्यांनी इशारा करून त्यांना न बोलण्याचा संदेश दिला. शिवाय अजित पवार यांनी तर थेट त्यांना बोलू नकोस असं सांगून टाकलं.
 
अजित पवार यांचं हे वागण जरी सूत्र हतात घेण्याच्या तयारीत असल्याचं दिसत असलं तरी प्रत्यक्षात आता शरद पवार काय निर्णय घेतात यावरच सर्व अवलंबून आहे. कारण भाकरी फिरवण्याची वेळ आली आहे असं ते अलिकडेच म्हणालेत. त्यांनी भाकरी फिरवण्याची प्रक्रिया तर सुरू केली आहे. पण, ती वेळखाऊ आहे की तात्काळ यावरचा पडदा लवकरच उठेल.
 
तसंच हा निर्णय शरद पवार मागे घेणार नाहीत असं सुरेश भटेवरा म्हणाले. कारण आजपर्यंत त्यांनी कधीच त्यांची वक्तव्यं मागे घेतलेली नाहीत. त्यामुळे ते राजीनामा मागे घेतील असं वाटत नाही.
 
मात्र पक्षावरची ताकद आणखी बळकट करण्यासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी राजीनामा दिला होता आणि मागे घेतला होता. त्याचप्रमाणे शरद पवारही राजीनामा परत घेतील असं त्यांना वाटतं.
 
Published By- Priya Dixit 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Sharad Pawar Retirement: कोण होणार राष्ट्रवादीचा नवा अध्यक्ष? ही नावे चर्चेत