Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अमरावतीच्या शेतकऱ्याचा दिल्लीत राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान; या कारणासाठी झाली निवड

अमरावतीच्या शेतकऱ्याचा दिल्लीत राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान; या कारणासाठी झाली निवड
, सोमवार, 18 जुलै 2022 (08:39 IST)
शेतात नाविण्यपूर्ण प्रयोग करणारे अमरावती जिल्ह्यातील म्हसला, ता. बडनेरा येथील शेतकरी रविंद्र मेटकर यांना आज ‘जगजीवन राम अभिनव किसान’ राष्ट्रीय पुरस्काराने केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. येथील पुसा परीसरातील ए.पी. शिंदे सभागृहात आज केंद्रीय कृषी मंत्रालयाच्यावतीने ‘भारतीय कृषी संशोधन परिषदे’चा 94 वा स्थापना दिवसाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात केंद्रीय कृषी मंत्री श्री तोमर, केंद्रीय मत्स्य पालन, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री पुरूषोत्तम रूपाला, केंद्रीय कृषी आणि किसान कल्याण राज्यमंत्री कैलाश चौधरी, निती आयोगाचे सदस्य डॉ. रमेश चंद्र, आईसीएआर चे महासंचालक त्रिलोचन महापात्र मंचावर उपस्थित होते. राज्यसभेचे खासदार अनिल बोंडे या कार्यक्रमास उपस्थित होते.
यावेळी शेतीमध्ये विविध प्रयोग करणारे शेतकरी, वैज्ञानिक, संशोधन संस्था, शेतीशी निगडीत प्रकाशन संस्थांना वर्ष 2021 च्या राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले. राज्यातील अमरावती जिल्ह्याचे शेतकरी रविंद्र मेटकर, सोलापूरातील ‘डाळींब संशोधन संस्था’, आणि बारामती येथुन प्रकाशित होणारे ‘सुफलाम’ या प्रकाशनाला केंद्रीय मंत्री यांच्या हस्ते पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. केंद्रीय मंत्री श्री रूपाला यांनी त्यांच्या भाषणात सांगलीमधील युवकाने बैलाच्या मानेवरील ओझे कमी करण्यासाठी बनविलेले ‘रोलींग सपोर्ट’ यंत्राचा उल्लेख करून देशातील तरूण शेतक-यांच्या दृष्टीने कसा सकारात्मक विचार करतात असे श्री रूपाला या कार्यक्रमात म्हणाले.
 
रविंद्र मेटकर हे शेतीसोबत शेतीपुरक व्यवसाय करतात. श्री मेटकर यांनी आपल्या शेतामध्ये कुक्कुट पालन केले आहे. यामध्ये दिड लाख अंडी देणा-या कोंबडया असून यातून त्यांना दिवसाला 90, हजार अंडी मिळतात. या अंडयांची विक्री ते मध्यप्रदेश आणि अमरावती जिल्ह्यात करतात. कोंबडयांच्या विष्ठेचा उपयोग ते आपल्या शेतात सेंद्रीय खत म्हणून करतात. यामुळे पीकांच्या गुणवत्तेत आणि उत्पादनात भरघोस वाढ झालेली आहे. श्री मेटकर यांनी यावेळी आवाहन केले की, शेतकऱ्यांनी जोड व्यवसाय करावा जेणे करून खेळता पैसा राहील आणि उत्पन्नात वाढही होईल. आज त्यांना जगजीवन राम अभिनव किसान राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले. या पुरस्काराचे स्वरूप 1 लाख रूपयें रोख आणि प्रशस्ती पत्र असे आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

महाराष्ट्रातील सत्ता आणि राजकीय संघर्षाचा फैसला २० जुलै रोजी