माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरांवर छापे टाकल्यानंतर आता EDने त्यांना समन्स पाठवलं आहे. यामध्ये देशमुख यांनी चौकशीसाठी हजर व्हावे, असे आदेश ED ने दिले आहेत.
दरम्यान, देशमुख यांचे स्वीय सचिव पालांडे आणि कुंदन शिंदे यांना अटक करून कोर्टात हजर करण्यात आलं. यावेळी अनिल देशमुख हेसुद्धा बदली आणि बार मालकांकडून पैसे घेण्याच्या गैरव्यवहारात सहभागी असल्याचा आरोप ईडीने न्यायालयात केला आहे.
प्रिव्हेनशन ऑफ मनी लाँडरिंग अॅक्टअंतर्गत (PMLA) या सर्वांची चौकशी करण्यात येत आहे.
कोर्टात काय घडलं?
आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात EDने दाखल केलेल्या गुन्ह्याची सुनावणी सध्या मुंबईच्या सत्र न्यायालयात सुरू आहे.
संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे यांना अटक करून EDने कोर्टात हजर केलं आहे.
यावेळी सुनावणीदरम्यान ईडीने म्हटलं, "CBI ने अनिल देशमुख यांच्याविरोधात FIR दाखल केली आहे. ईडीने रेकॅाड केलेला जबाब कोर्टात मान्य केला जातो. अनिल देशमुख यांच्याविरोधात 11 मे ला ECIR रजिस्टर करण्यात आला. सुरुवातीला ईडी समन्स देतं. त्याला सहकार्य केलं नाही तर पुढे कारवाई केली जाते.
सदर केस बदलीसाठी तसंच बार मालकांकडून पैसे घेतल्यासंदर्भात आहे. बार मालकांचे जबाब नोंदवण्यात आले.
त्यानुसार, सचिन वाझे यांना गुड लक मनी म्हणून 40 लाख रुपये देण्यात आले होते.
झोन 1-7 यांच्याकडून 1.40 कोटी रूपये देण्यात आले. झोन 7 ते 12 च्या बारमालकांकडून 2.66 कोटी रूपये गोळा करण्यात आले. बार विनाअडथळा सुरू राहावेत, यासाठी हे पैसे सचिन वाझेंना दिले.
याप्रकरणी सचिन वाझेंचाही जबाब नोंदवण्यात आला आहे. अनिल देशमुख यांच्या सांगण्यानुसार, पैसे गोळा करून ते कुंदन शिंदे यांना पैसे दिले, असं वाझेंनी म्हटलं. शिवाय संजीव पालांडे यांनी पैसे घेतले, असं पोलीस अधिकाऱ्यांनीही जबाबात सांगितलं आहे.
अनिल देशमुख या संपूर्ण पैशाच्या गैरव्यवहारात सहभागी आहेत. कुंदन शिंदे यांनी अनिल देशमुख यांच्यासाठी पैसे घेतले, असं ED ने न्यायालयात म्हटलं.
आरोपी चौकशीला सहकार्य करत नाहीत. त्यांना पैसे मिळत होते. त्यापैकी किती पैसे त्यांनी पुढे दिले याची माहिती घ्यायची आहे. आरोपींना रक्कम किती मिळाली याची चौकशी करायची आहे. तसंच 4 कोटी रुपये कंपन्यांमध्ये ट्रान्सफर करून ते पुन्हा परत आले, याचीही चौकशी करण्याची गरज आहे, असं ED ने कोर्टात म्हटलं.
देशमुखांनी चौकशीस हजार होण्यासाठी मागितली मुदत
आज (शनिवार, 26 जून) सकाळी 11 वाजता देशमुख यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. मात्र देशमुख यांनी आज चौकशीसाठी येणं शक्य नसल्याचं सांगत वेळ वाढवून मागितली आहे.
अनिल देशमुख यांनी सकाळी ईडीचं समन्स प्राप्त झाल्यानंतर आपल्या वकिलांमार्फत त्यांना पत्र पाठवलं.
"तुम्ही माझ्या घरी धाड टाकल्यानंतर मी सहकार्य केलं होतं. माझा जबाब PMLA च्या कलम 50 अंतर्गत नोंदवण्यात आला आहे. चौकशीसाठी समन्स देताना तुम्ही माझ्याकडून काही कागदपत्रं मागितली आहेत. पण माझ्याविरोधात दाखल गुन्ह्याची कागदपत्र मला देण्यात आलेली नाहीत.
त्यामुळे मला ही कागदपत्रं देता येणार नाहीत. माझ्याविरोधात करण्यात आलेले सर्व आरोप खोटे आहेत. यामध्ये काहीही तथ्य नाही. मी 72 वर्षांचा असून मला सहव्याधी आहेत. काल चौकशीदरम्यान अनेक लोकांच्या मी संपर्कात आलो आहे. त्यामुळे ईडी चौकशीसाठी हजर राहणं मला आज शक्य होणार नाही, असं देशमुख यांनी ईडीला लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.
अनिल देशमुख यांच्या घरांवर छापेमारी
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मुंबईतील वरळी येथील निवासस्थानी आणि नागपुरातील सिव्हिल लाईन्स येथील जीपीओ चौकातील 'श्रद्धा' या निवासस्थानी ED ने धाड टाकली. तसंच देशमुख यांच्या निकटवर्तीयांच्या घरीही ED ने छापा टाकला.
अनिल देशमुख यांचे सचिव कुंदन आणि संजीव पालांडे यांच्या घरीदेखील काल (शुक्रवार, 25 जून) ईडीनं छापा टाकला. विशेष म्हणजे, या सर्व ठिकाणी ED ने एकाच वेळी छापेमारी केली.
सर्वच ठिकाणी छापेमारीसाठी स्थानिक पोलिसांचा मोठा बंदोबस्त ED च्या सोबतीला होता.
मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना 20 मार्च रोजी लिहलेल्या पत्रातून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप केले होते. अनिल देशमुख यांनी गृहमंत्री असताना मुंबईतील बार आणि हॉटेलमालकांकडून हप्तेवसुली करण्याचा आदेश पोलिसांना दिल्याचा आरोप सिंग यांनी केला होता.
या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाने CBI ने 5 एप्रिल 2021 रोजी गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाचा तपास करताना CBI ने कोलकाता येथे दोन बनावट कंपन्यांचे दस्ताऐवज आढळल्याचे जाहीर केले होते.
या बनावट कंपन्यांद्वारे कोट्यवधी रुपयांचे व्यवहार झाल्याचं या कंपन्यांच्या बँक खात्यावरुन CBI ला कळलं होत. या बनावट कंपन्या अनिल देशमुख यांच्या किंवा त्यांच्या कुटुंबियांशी संबधित असल्याचा संशय CBI ला आला.
CBI ने दाखल केलेल्या FIR चा अभ्यास केल्यानंतर ED ने या प्रकरणात अवैध सावकारी प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यासंबधात हालचाली सुरु केल्या.
केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या अखरित्याखाली येणाऱ्या अंमलबजावणी संचालयनालय म्हणचेच ED ने 11 मे 2021 रोजी अनिल देशमुख यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे.
त्यानंतर संध्याकाळी माध्यमांशी बोलताना देशमुख यांनी म्हटलं, ईडीच्या अधिकाऱ्यांना संपूर्ण सहकार्य केलंय, पुढील काळातही करेन.
परमबीर सिंह यांच्याविषयी बोलताना ते म्हणाले, "परमबीर सिंग यांना त्यांच्या पदावरून हटवल्यानंतर त्यांनी माझ्यावर खोटे आरोप केले. मुंबईचे आयुक्त असताना त्यांनी आरोप करायला पाहिजे होते.
"पोलीस आयुक्तालयातील सचिन वाझे, सुनिल माने, रियाझुद्दीन काझी यांना अटक केली. हे सर्व अधिकारी परमबीर सिंह यांना रिपोर्ट करत होते. हे अधिकारी मुकेश अंबानी स्फोटकं आणि मनसुख हिरेन प्रकरण प्रकरणात सहभागी आहेत. NIA याचा तपास करतेय. हे अधिकारी आता तुरूंगात आहेत."
"या प्रकरणाची सीबीआय आता चौकशी करत आहे, ईडीसुद्धा चौकशी करत आहे. मी त्यांना सहकार्य करणार आहे," असंही देशमुख म्हणाले.
'एजन्सीचा गैरवापर ही सत्ताधाऱ्यांची SOP'
अनिल देशमुख यांच्या घरी ईडीने टाकलेला छापा म्हणजे विरोधकांना त्रास देण्यासाठी सत्तेचा करण्यात आलेला गैरवापर आहे, अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.
"राजकारण हे विचारांच असतं आणि लोकांच्या सेवेसाठी असतं. आजपर्यंत या देशात एजन्सीचा वापर आपल्या विरोधकासाठी विरोधात पाहिला नाही, ऐकलेला नाही पण वाचण्यात आला आहे , पण एजन्सीचा गैरवापर हा याचा स्टाईल ऑफ ऑपरेशन SOP दिसत आहे. भाजपची सत्ता आल्यापासून शरद पवारांनाही नोटीस आली होती. या गोष्टीचा अनुभव सगळ्यांनीच घेतला आहे," असं सुळे यांनी म्हटलं.
त्या पुढे म्हणाल्या, "महाराष्ट्रात असं राजकारण कधी होत नाही. राज्यात सत्तेचा गैरवापर कधीही विरोधकांना त्रास देण्याकरिता केला गेला नाही. ही नवीनच स्टाईल सध्या दिसून येत आहे. हे जाणूनबुजून करण्यात येत आहे.
महाविकास आघाडी विकासाचा राजकारण करत आहे. कोरोना तिसऱ्या लाटेसंदर्भात आम्ही काम करत आहोत. वैयक्तिक राजकारण आम्ही कधीच करत नाही, असंही सुळे म्हणाल्या.
सर्वांचं लक्ष कोरोनावर हवं - दिलीप वळसे पाटील
राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी अनिल देशमुख-ईडी छापा प्रकरणावर सावध प्रतिक्रिया दिली.
मी याबाबत जास्त बोलू इच्छित नाही. संबंधित यंत्रणा तपास करत आहे. चुकीच्या वेळी चुकीचच्या गोष्टी करण्यात येत आहेत. सध्या सर्वांचं लक्ष कोरोनावर असायला हवं. असं दिलीप वळसे पाटील म्हणाले.
राज्यात कुणीही काहीही मागणी केली, तर चौकशी होत नसते. कुणाच्याही CBI चौकशीसाठी राज्याची परवानगी घ्यावीच लागेल, असंही वळसे पाटील यांनी म्हटलं.
काय आहे प्रकरण?
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. काही दिवसांपूर्वीच सचिन वाझे प्रकरणी परमबीर सिंह यांची मुंबई पोलीस आयुक्त पदावरून बदली करण्यात आली होती.
दरम्यान, 'मुकेश अंबानी प्रकरणी तसेच मनसुख हिरेन हत्याप्रकरणी यांचा सहभाग स्पष्ट हेत असताना त्याचे धागेदोरे परमबीर सिंग यांच्यापर्यंत पोहचणार असल्याचं तपासातून स्पष्ट होत असताना परमबीर सिंग यांनी स्वतःला वाचवण्यासाठी आणि कारवाईपासून वाचण्यासाठी खोटा आरोप केला आहे', अशी अनिल देशमुख यांनी आपली बाजू ट्वीटरवर मांडली आहे.
आतापर्यंत ED ने काय काय कारवाई केली?
ED च्या पथकाने 16 जून 2021 रोजी कारवाई करत नागपूरातील दोन सीए आण एका कोळशा व्यापाऱ्याच्या घरासह सहा ठिकाणी छापेमारी केली होती. या सहा लोकांचे अनिल देशमुख यांच्या किंवा त्यांच्या कुटुंबीयांशी व्यावसायिक संबंध असल्याचा संशय ED ला होता.
25 मे रोजी ईडीच्या तीन पथकांनी नागपूरात छापेमारी केली होती. यात अंबाझरी परिसरातील शिवाजीनगरमधील हरे कृष्ण अपार्टमेंट मध्ये राहणारे सागर भटेवरा यांच्या घरी कारवाई केली. भटेवरा हे रबिया प्रॉपर्टीजचे संचालक असल्याचं आणि याच कंपनीत अनिल देशमुख यांचा मुलगा ऋषीकेश हा देखील संचालक असल्याच ED च्या तपासात उघड झाल होतं.
याच वेळी सदर भागातील न्यू कॉलनीतील समीत आयझॅक आणि गिट्टीखदानच्या जाफरनगरमधील कादरी बंधूंकडे ED ने छापे टाकले. हे तिघेही देमुख यांचा मुलगा सलील देशमुख यांचे मित्र आहेत, असा संशय ED ला आहे.
याच संपूर्ण प्रकरणात ED ने मुंबईतील अंधेरी परिसरात हॉटेल आणि बार चालकाचे जबाब नोंदवले आहेत. या बारमालकाने महिन्याला अडीच लाख रुपये सचिन वाझे यांना दिल्याचे सांगितले आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या नियंत्रणानंतर बार सुरु झाल्यावर कुठलाही त्रास न देण्यासाठी है पैसे दिल्याच सांगण्यात आलं.
CBI चा तपास कुठपर्यंत आलाय ?
21 एप्रिल रोजी CBI ने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात भ्रष्टाचार विरोधी कायद्याच्या कलम 7 आणि भारतीय दंड संहिता IPC च्या कलम 120 B नुसार गुन्हा दाखल केला.
CBI ने या प्रकरणात अनिल देशमुख यांच्या संबधित काही ठिकाणी छापेमारी केली होती. अनिल देशमुख यांच्या दोन पीएचीही चौकशी CBI ने केली. या प्रकरणात दाखल असलेल्या FIR वर नियमित तपास सुरु असल्याच CBI ने कोर्टाला सांगितल आहे.
30 एपिल रोजी CBI ने विशेष CBI न्यायालयात तपासाचा प्राथमिक अहवाल सादर केला.
या अहवालात सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी न्यायालयाला सांगितले, " या प्रकरणात आम्ही काही ठिकाणी छापेमारी केली आणि पुरावे जमा केले. काही साक्षीदारांचे बयाणही नोंदवण्यात आले. आतापर्यंतच्या तपासाची माहिती आणि पुरावे बंद लिफाफ्यात कोर्टाला आम्ही सादर करित आहोत." अंमलबजावणी संचालयनालय ED च्या पथकाने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपुरातील घरी छापा टाकला. मुंबईहून गुरुवारी (24 जून) रात्री नागपुरात दाखल झालेलं ED च पथक शुक्रवारी (25 जून) सकाळी 9 वाजता देशमुख यांच्या घरी पोहचलं.