अकरावीसाठी १५ जुलैपासून अर्ज सादर करता येईल

गुरूवार, 2 जुलै 2020 (11:26 IST)
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांतील ज्युनियर कॉलेजांमध्ये इयत्ता अकरावी प्रवेशासाठी राबविण्यात येणाऱ्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेलाआज, गुरुवारपासून (२ जुलै) सुरुवात होणार आहे. विद्यार्थ्यांना १५ जुलैपासून ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करता येणार आहेत.
 
करोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा प्रवेश प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने होणार असून, विद्यार्थ्यांना नोंदणी करताना लॉगइन आयडी आणि पासवर्ड ऑनलाइन उपलब्ध होणार आहे. सर्व प्रकारच्या कोट्यातून प्रवेश घेण्यासाठी नोंदणी आवश्यक आहे; तसेच प्रथम येणाऱ्यास, प्रथम प्राधान्य फेरी नसल्याने, अधिकाधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी करावी, असे आवाहन अकरावी केंद्रीय प्रवेश नियंत्रण समितीच्या सचिव मीना शेंडकर यांनी केले आहे.करोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा दहावीचा निकाल रखडला असला, तरी विद्यार्थी-पालकांच्या सोयीसाठी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात येणार आहे. या प्रवेश प्रक्रियेचा अर्ज भाग १ आणि भाग २ अशा दोन टप्प्यात आहे. भाग १ निकालापूर्वी आणि भाग २ निकालानंतर भरता येतो. त्यानुसार दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना १५ जुलैपासून ते दहावीचा निकाल जाहीर होईपर्यंत अर्जाचा भाग १ भरता येणार आहे.
 
या भागात विद्यार्थ्यांना नोंदणी करण्यासोबतच, वैयक्तिक माहिती, प्रवेशाचा अर्ज भरायचा आहे; तसेच भरलेली माहिती निश्चित (अॅप्रुव्ह) करण्यासाठी मार्गदर्शन केंद्र निवडायचे आहे. त्याचप्रमाणे अर्ज निश्चित झाला आहे, याची खात्री करायची आहे. त्यानंतर १६ जुलै ते निकाल जाहीर होईपर्यंत अर्ज भरून झालेल्या विद्यार्थ्यांचे अर्ज निश्चित करायचे राहिले असल्यास, त्यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून कार्यवाही करण्यात येणार आहे, अशा सूचना शेंडकर यांनी दिल्या आहेत.
 
दरम्यान, २ जुलै ते १६ जुलै या कालावधीत कॉलेजांची नोंदणी; तसेच पडताळणी करण्याची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. यंदा महितीपुस्तिका छापण्यात येणार नसून, त्या पीडीएफ स्वरूपात वेबसाइटवर उपलब्ध होतील. त्याचप्रमाणे प्रवेश प्रक्रिया शुल्कही ऑनलाइन भरता येणार आहे. प्रवेश प्रक्रियेच्या सविस्तर माहितीसाठी विद्यार्थी व पालकांनी अधिक माहितीसाठी वेबसाइटला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

वेबदुनिया वर वाचा

पुढील लेख गांजाच्या पानांची भाजी मेथी समजून खाल्ली आणि संपूर्ण कुटुंबाची शुद्ध हरपली