Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अर्जुन खोतकर : 'सकाळी उद्धवसाहेबांशी बोललो, आता एकनाथ शिंदेंच्या गटात जातोय'

arjun khotkar
, शनिवार, 30 जुलै 2022 (12:51 IST)
शिवसेनेचे वरिष्ठ नेते अर्जुन खोतकर यांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं समर्थन केलं आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंशी सकाळी बोललो आणि परवानगी घेतली, त्यानंतरच एकनाथ शिंदेंच्या समर्थनाचा निर्णय घेतल्याचेही अर्जुन खोतकरांनी स्पष्ट केलं.
 
शिंदे गटात जातानाचा निर्णय जाहीर करताना अर्जुन खोतकर यांच्या डोळ्यात अश्रू आले. संकटात असल्यानं सहारा शोधला, असं म्हणत त्यांनी शिंदे गटाचं समर्थन जाहीर केलं.
 
शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्याबद्दल वाईट कधीच बोलणार नाही, त्या पक्षात मी 40 वर्षे काढलीत, असंही खोतकर म्हणाले.
 
शिवसेना नेते अर्जुन खोतकरांच्या घरासह कार्यालयांवर ED चे छापे
शिवसेनेचे नेते आणि माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या जालन्यातील घरी आणि त्यांच्याशी संबंधित कार्यालयांवर अंमलबजावणी संचलनालयानं ईडीची छापेमारी केली होती. अर्जुन खोतकर सभापती असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ED कडून तपासणी करण्यात आली
 
26 नोव्हेंबर 2021 रोजी सकाळी 8 वाजल्यापासून ईडीच्या 12 अधिकाऱ्यांचं पथक चौकशी केली.
 
दुसरीकडे, 10 हजारपेक्षा जास्त शेतकऱ्यांची जमीन अर्जुन खोतकर यांनी हडप केल्याचा आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला होता.
 
ईडीच्या रडारवर असलेले महाविकास आघाडीतले 9 नेते
महाविकास आघाडी सरकारचे मंत्री आणि नेते केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमागे लागलेली 'ईडी' पिडा संपण्याचं नाव घेत नाहीये.
 
उद्धव ठाकरेंचे विश्वासू कॅबिनेटमंत्री अनिल परब, वाशिमच्या खासदार भावना गवळी आणि माजी खासदार आनंदराव अडसूळांभोवती ईडी चौकशीचा फेरा पडलाय.
 
उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून 7 नेते आणि त्यांचे कुटुंबीय चौकशीच्या फेऱ्यात अडकले होते.
 
गेल्या वर्षभरात अजित पवार, पृथ्वीराज चव्हाण, एकनाथ खडसे, प्रताप सरनाईक यांना चौकशीच्या नोटीसा आल्या आहेत.
 
शिवसेना नेत्यांमागे लागलेली 'ईडी' पिडा
उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत वेगळी चूल मांडल्यानंतर भाजपने आपला मोर्चा महाविकास आघाडी सरकारकडे वळवलाय.
 
भाजप नेत्यांकडून सातत्याने महाविकास आघाडी सरकारचे मंत्री आणि नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात येत आहेत. शिवसेना नेतेही भाजपच्या निशाण्यावर आहेत.
 
शिवसेनेचे बडे नेते ईडी चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत.
 
त्यात शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांच्या पत्नीला ईडीने नोटीस पाठवली, तर आमदार प्रताप सरनाईक आणि त्यांच्या कुटुंबियांची चौकशी करण्यात आली.
 
1. अनिल परब
अनिल देशमुख चौकशी प्रकरणी राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब ईडीच्या रडारवर आहेत. बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेंनी एनआयए कोर्टाला लिहीलेल्या पत्रात अनिल परबांवर खंडणी वसूल करण्याचे आरोप केलेत.
 
परिवहन मंत्री अनिल परब यांची मंगळवारी (29 सप्टेंबर) ईडीच्या अधिकाऱ्यांकडून त्यांची तब्बल 8 तास चौकशी झाली. सकाळी 11 वाजता अनिल परब ईडी कार्यालयात दाखल झाले होते. त्यानंतर संध्याकाळी 7 वाजता ते ईडी कार्यालयातून बाहेर पडले.
 
आपण ईडी अधिकाऱ्यांच्या सर्व प्रश्नांना उत्तरं दिल्याचं अनिल परब म्हणाले. तसंच यापुढेही ईडीला पूर्ण सहकार्य करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
 
2. भावना गवळी
ईडीने शिवसेना खासदार भावना गवळी यांना 4 ऑक्टोबरला चौकशीसाठी उपस्थित राहण्यासाठी समन्स बजावलं आहे.
 
ऑगस्ट महिन्यात ईडीने शिवसेना खासदार भावना गवळींच्या 5 संस्थांवर छापेमारी केली. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी 100 कोटी रूपयांच्या भ्रष्टाचाराचे आरोप भावना गवळी यांच्यावर केले होते.
 
वाशिल जिल्ह्यातील महिला उत्कर्ष प्रतिष्ठान, बीएमएस कॉलेज, बालाजी सहकारी पॉलिटीकल बोर्ड, भावना अॅग्रो प्रॉडक्ट्स यांच्यावर रेड करून चौकशी सुरू केली होती.
 
भावना गवळींवर खोट्या सह्या करून ट्रस्टची कंपनी बनवून नॉन प्रॉफिट कंपनी असल्याचं दाखवून पैशांची अफरातफर केल्याचा आरोप आहे.
 
ईडी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भावना गवळी यांच्या महिला उत्कर्ष प्रतिष्ठान ट्रस्टमध्ये आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी सईद खान यांना मंगळवारी अटक करण्यात आली. सईद खान भावना गवळी यांचे जवळचे मानले जातात.
 
3. आनंदराव अडसूळ
शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ आणि त्यांचे पुत्र अभिजीत अडसूळ यांना कथित सिटी को-ऑप बॅंक घोटाळ्याप्रकरणी ईडीने सोमवारी (27 सप्टेंबरला) चौकशीसाठी बोलावलं होतं.
 
ईडीने सोमवारी अडसूळांची चौकशी करण्यासाठी त्यांच्या कांदिवलीच्या घरी छापेमारी केली. सिटी बॅंकेच्या माध्यमातून मराठी माणसांची फसवणूक केल्याचा आरोप आमदार रवी राणा यांनी केला होता.
 
सिटी बॅंकेत कामगार, पेंशनधारक अशा 99 टक्के मराठी माणसांची खाती होती. या बॅंकेतील पैसे बिल्डरांना अवैधरित्या वाटल्याचा आरोप करण्यात आला. यासाठी अडसूळांनी कमिशन घेतल्याचा आरोप होतोय.
 
4. प्रताप सरनाईक
शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईकही ईडीच्या रडारवर आहेत. कथित टॉप सिक्युरीटी घोटाळ्याप्रकरणी ईडीने प्रताप सरनाईक आणि त्यांच्या मुलांची चौकशी केली आहे.
 
केवळ शिवसेनाच नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसचे काही नेतेही ईडीच्या रडारवर आहेत. कोण आहेत हे नेते?
 
5. अजित पवार
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार सिचंन घोटाळ्याप्रकरणी रडारवर आहेत. पुन्हा सत्तेत आल्यानंतर मे 2020 मध्ये ईडीने अजित पवारांविरोधात मनी लाँडरिंग (आर्थिक गैरव्यवहार) प्रकरणी चौकशी सुरू केली आहे.
 
राज्याच्या एँटी करप्शन ब्यूरोने मात्र अजित पवारांना सिंचन घोटाळ्याप्रकरणी क्लिनचीट दिली होती.
 
राज्य सहकारी बँकेच्या कथित आर्थिक घोटाळा प्रकरणात पोलिसांनी सादर केलेल्या क्लोजर रिपोर्टलाही ईडीने विरोध दर्शवला आहे. 
 
6. अनिल देशमुख
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी 100 कोटींची खंडणी वसूल करण्याचा आरोप केला.
 
कोर्टाच्या आदेशानंतर सीबीआयने भ्रष्टाचारप्रकरणी गुन्हा दाखल करून चौकशी सुरू केली. अनिल देशमुख यांच्यावर सीबीआय त्यानंतर ईडीनेही गुन्हा दाखल करून छापेमारी केली.
 
ईडीने अनिल देशमुख यांना चौकशीसाठी पाच समन्स पाठवले. पण, एकाही समन्सला अनिल देशमुख उपस्थित राहीले नाहीत.
 
मनी लॉंडरिंग प्रकरणी अनिल देशमुख यांची चार कोटी रूपयांची मालमत्ता ईडीने काही दिवसांपूर्वी जप्त केलीय.
 
7. एकनाथ खडसे
भाजपला सोडचिठ्ठी देत माजी मंत्री एकनाथ खडसेंनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर डिसेंबर महिन्यात एकनाथ खडसेंना ईडीने चौकशीसाठी नौटीस बजावली.
 
पुण्यातील कतिथ एमआयडीसी भूखंड घोटाळ्याप्रकरणी ईडीने एकनाथ खडसे यांचा जबाब नोंदवून घेतलाय. तर, खडसेंच्या जावयाला या प्रकरणी ईडीकडून अटक करण्यात आली आहे.
 
मंत्री असताना आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा एकनाथ खडसे यांच्यावर आरोप आहे.
 
नेत्यांचे नातेवाईक चौकशीच्या फेऱ्यात
8. संजय राऊत
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांची काही दिवसांपूर्वी अंमलबजावणी संचलनालय म्हणजेच ईडीने चौकशी केली. पीएमसी बॅंक घोटाळ्याप्रकरणी ही चौकशी करण्यात आल्याचं बोललं जात आहे.
 
 
मैत्रीणीकडून घेतलेल्या 50 लाखांच्या कर्जाप्रकरणी ईडीच्या अधिकाऱ्यांनी वर्षा राऊत यांना समन्स बजावला होता. या प्रकरणी ईडीने वर्षा राऊत यांचा जबाब नोंदवून घेतला आहे.
 
9. नवाब मलिक
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्यांकमंत्री नवाब मलिक यांचा जावई समीर खानला नार्कोटीक कंट्रोल ब्यूरोने बुधवारी (13 जानेवारी) अटक केली आहे. ड्रग्ज ट्रफिकिंग प्रकरणी ही अटक करण्यात आल्याची माहिती नार्कोटीक कंट्रोल ब्यूरोने दिली आहे.
 
ड्रग्ज प्रकरणी अटक करण्यात आलेल्या एका आरोपीसोबत समीर खान यांनी आर्थिक व्यवहार केले असा त्यांच्यावर आरोप आहे.
 
समीर खानला कोर्टाकडून दोन दिवसांपूर्वी जामीन मिळालाय.
 
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना आयकर विभागाने नोटीस बजावली होती. त्यात चव्हाण यांच्याकडून मागील 10 वर्षातील संपत्तीची माहिती आयकर विभागाने मागवली आहे.
 
 
 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी : 'मराठी माणसाला कमी लेखण्याचा माझा हेतू नव्हता'