Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आर्यन खान प्रकरण : किरण गोसावी पुणे पोलिसांच्या ताब्यात, अटकेची प्रक्रिया सुरू

आर्यन खान प्रकरण : किरण गोसावी पुणे पोलिसांच्या ताब्यात, अटकेची प्रक्रिया सुरू
, गुरूवार, 28 ऑक्टोबर 2021 (10:02 IST)
क्रूझ ड्रग्ज प्रकरणामध्ये एनसीबीचे साक्षीदार असलेले किरण गोसावी यांना अटक झाली आहे. पुणे पोलिसांनी फसवणुकीच्या गुन्ह्यामध्ये त्यांना अटक केली आहे.
 
पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी किरण गोसावीला ताब्यात घेण्यात आलं असून अटकेची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती बीबीसी मराठीला दिली माहिती.
 
गोसावी यांना आज (28 ऑक्टोबर) कोर्टात हजर करण्यात येणार आहे.
 
गेल्या काही दिवसांपासून गोसावी हे फरार होते. त्यामुळं पुणे पोलिसांनी त्यांच्या विरोधात लुक आऊट नोटीसही जारी केली होती. त्यानंतर आता त्यांना अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
 
कुठल्या प्रकरणी अटक?
पुण्यात किरण गोसावींच्या विरोधात काही गुन्हे दाखल होते. 2018 मध्ये चिन्मय देशमुख यांनी गोसावींच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. त्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे.
 
गोसावी यांनी चिन्मयला मलेशियाला नोकरी देण्याचं आमिष दाखवलं होतं. पण मलेशियाला गेल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचं चिन्मय यांच्या लक्षात आलं. त्यानंतर त्यांनी याबाबत तक्रार केली होती.
 
गोसावी यांनी बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत याबाबत आरोप फेटाळले होते. "माझ्यावर दाखल झालेली केस संपली आहे. हे गुन्हे टेक्निकल स्वरूपाचे आहेत. हे गुन्हे माझ्या कामाशी संबंधित आहेत."
 
"पुण्याच्या प्रकरणातील व्यक्तीला मी मलेशियाला पाठवलं होतं. पण काही वैद्यकीय कारणांमुळे ते परत आले. त्यांनी वैद्यकीय गोष्टी माझ्यापासून लपवल्या, असं त्यांनी सांगितलं होतं. उलट मलेशियात त्यांच्यावर केस होणार होती. त्यातून मीच त्यांना वाचवलं," असं गोसावी म्हणाले होते.
 
'माझ्या जीवाला धोका'
जीवाला धोका असल्याच्या कारणामुळं महाराष्ट्राबाहेर असल्याचं किरण गोसावी यांनी बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं. आर्यन खान प्रकरणात समोर आलेल्या फोटोंनंतर किरण गोसावी चर्चेत आले होते.
 
किरण गोसावी यांनी बीबीसीबरोबर बोलताना पोलिसांना शरण यायला तयार असल्याचं सांगितलं होतं. "मी सरेंडर होण्यासाठी तयार आहे. सहा ऑक्टोबरला मी सरेंडर करणार होतो. पण त्यादिवशी मला फोन आला की, सरेंडर झाल्यानंतरही काय हाल होतील ते आम्ही पाहू. मग मी विश्वास कोणावर ठेऊ?" असं गोसावी म्हणाले होते.
 
गोसावी यांचे सुरक्षा रक्षक असलेले प्रभाकर साईल यांनी किरण गोसावी यांच्यावर एनसीबीच्या छाप्याशी संबंधित काही गंभीर आरोप केले होते.
 
किरण गोसावी कोण आहेत?
किरण गोसावी हे स्वतः प्रायव्हेट डिटेक्टिव्ह असल्याचं सांगतात. पुण्यात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीमध्ये किरण गोसावी केपीजी ड्रिम्स सोल्युशन्स नावाची फर्म मुंबईतील घाटकोपर भागात चालवत असल्याचं सांगण्यात आले आहे.
 
गोसावी यांच्या विरोधात याशिवायदेखील इतर काही गुन्हे दाखल आहेत.
 
2015 मध्ये देखील ठाण्यातील कापुरबावडी पोलीस स्टेशनमध्येही गोसावींच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झालेला आहे. अंधेरीमध्ये देखील 2007 साली गोसावींवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

गिर्यारोहकाने लावला कन्नड तालुक्यातील जामडी घाट येथे अप्रकाशित लेणीचा शोध