“जोपर्यंत आमच्या रक्तात छत्रपती आहेत तोपर्यंत आम्हाला कोणी गुलाम करु शकत नाही. जोपर्यंत आमच्या विचारात छत्रपती आहेत तोपर्यंत आमचे विचार कोणी थांबवू शकत नाही. जोपर्यंत आमच्या कृतीत छत्रपतींचं समर्पण आहे, तोपर्यंत आम्ही अन्याय करु शकत नाही” असं विधान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आयोजित एका कार्यक्रमात केलं आहे. ठाण्यातील सकल मराठा समाजातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. खरं तर ठाण्यात सकल मराठा समाजाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात येण्याची मला या अगोदर देखील संधी मिळाली. अतिशय उत्साहाने ही शिवज्योत संपूर्ण ठाण्यात लोकांना दर्शनासाठी दारापर्यंत जाते. ही मिरवणूक आम्हाला राजाची भव्यता सांगते तसेच हा भगवा आम्हाला त्यांच्या त्यागाची आठवण करुन देतो. ज्या त्यागातून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची निर्मिती केली.”
“खरं म्हणजे शिवाजी महाराजांनी सगळ्यात महत्त्वाचं काही केलं असेल तर 18 पगडजातीच्या 12 मावळातील सामान्य माणसाला, शेतकऱ्याला, शेतमजुराला, बारा बलुतेदाराला एकत्रित केले आणि त्यांना सांगितले की पारतंत्र्यातून तुमची सुटका करण्यासाठी या जुलमी शासनातून तुमची सुटका करण्यासाठी कुणी ईश्वराचा अवतार येणार नाही. तुमच्यातील ईश्वर, पौरुष जागृत करायचा आहे आणि तुम्हालाच या असुरी शक्तीचा निपात करायचा आहे. या असुरी शक्तीचा निपात करायची ताकद, पौरुष या सामान्य माणसात छत्रपती शिवाजी महाराजांनी तयार केली आणि या पौरुषामुळेच आमचे छोट-छोटे मावळे कमी संख्येने देखील हजारो, लाखोंच्या फौजांवर त्या ठिकाणी भारी पडले,” असंही फडणवीस यांनी नमूद केले आहे.