नाशिक नुकत्याच पार पडलेल्या नवरात्रोत्सव आणि कालिका यात्रेत मोठा कट शिजविण्यात आल्याची धक्कादायक बाब उजेडात आली आहे. एका इडली व्यावसायिकाने बनावट नोटा चलनात आणण्यासाठी प्रयत्न केले. नाशिक पोलिसांच्या सतर्कतेमुळे तब्बल ५ लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. तसेच, याप्रकरणी पोलिसांना आणखी धागेदोरे मिळण्याची चिन्हे आहेत.
मुंबई नाका पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कालिका देवी हे नाशिकचे ग्रामदैवत आहे. त्यामुळे नवरात्रोत्सवात कालिका देवीची मोठी यात्रा भरते. याच यात्रेच्या निमित्ताने बनावट नोटा चलनात आणण्याचे मोठे षडयंत्र रचण्यात आले. मात्र, हे षडयंत्र प्रत्यक्षात यशस्वी होऊ शकलेला नाही. बनावट नोटांची गोपनीय माहिती मुंबई नाका पोलिसांना प्राप्त झाली. त्यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील रोहकले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे पथक नकली नोटांच्या मागावर होते.
याचदरम्यान पोलिसांना माहिती मिळाली की एका परप्रांतीय कामगाराकडे बनावट नोटांचा मोठा साठा आहे. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने सापळा रचला. अखेर हा परप्रांतीय इडली व्यावसायिक पोलिसांच्या हाती लागला आहे. मलायारसन मदसमय (वय ३३, मूळ रा. ३९, ईस्टमार्ग कायथर, पण्णीकार, कुलूम, तुदूकुडी, तामिळनाडू) असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्याला भारत नगर परिसरातून पोलिसांनी जेरबंद केले आहे.
मलायारसनची कसून चौकशी आणि त्याच्या खोलीची झडती घेतली असता ५०० रुपये किंमतीच्या ४० बनावट नोटा, दोन हजार रुपये किंमतीच्या २४४ बनावट नोटा अशा एकूण ५ लाख ८ हजार रुपयांच्या बनावट नोटा आढळूम आल्या आहेत. शिवाय त्याच्याकडे ३ हजार ३०० रुपयांची रोख रक्कम सापडली आहे. मलायारसन हा गेल्या दीड दशकापासून नाशकात राहतो. त्याने या नोटा कुठून आणल्या, चलनात आणण्यासाठी काय प्रयत्न केले, त्याचे अन्यकुणी साथीदार आहेत का, या प्रकरणाचे मोठे रॅकेट आहे का, तो कदीपासून हा उद्योग करीत होता यासह अन्य बाबींचा उलगडा होणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor