संतोष परब हल्ला प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असताना नितेश राणेंची प्रकृती खालावली होती. त्यावेळी त्यांना सिंधुदुर्गातून कोल्हापुरातील रुग्णालयात हलवण्यात आले होते. तेव्हा माझ्या हत्येचा कट रचण्यात आला होता, रुग्णालयातील एका कर्मचाऱ्याने मला सतर्क केल्यानं मी वाचल्याचोही दावा भाजप आमदार नितेश राणेंनी केलाय. भाजप आमदार नितेश राणेंनी विधानसभेत यासंदर्भात माहिती दिलीय.
कोल्हापूरच्या जिल्हा रुग्णालयात मला उपचारासाठी दाखल केलं होतं. अचानक डॉक्टर माझ्याकडे आले आणि त्यांनी माझ्याकडे आग्रह केला, नितेशजी तुमची अँजिओ करण्याची आवश्यकता आहे. तेव्हा मी म्हणालो मला तसं तरी वाटत नाही. त्यावेळी डॉक्टर म्हणाले की, सीटी अँजिओ करावीच लागेल. त्यावेळी एका कर्मचाऱ्याने येऊन मला सतर्क केले. नितेशजी सीटी अँजिओ करू नका, त्यानिमित्ताने तुमच्या शरीरात इंक टाकून तुम्हाला मारण्याचा प्लॅन आहे. त्यामुळे तुम्ही ते करण्यास परवानगी देऊ नका, असं मला त्याने सांगितलं.
ईसीजी मशिनमध्ये खोटा रिपोर्ट बनवून वारंवार पोलिसांवर प्रेशर आणलं जात होते, कलानगर परिसरातून वारंवार फोन येत होते की, याला डिस्चार्ज करा, अटक करायची आहे. षडयंत्र रचायचं नाही, तर त्यांच्या शरीरात चुकीची औषधं टाकायची आणि कायमस्वरुपी विषय संपवून टाकायचं असं म्हणत त्यांनी ठाकरे सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.