आज अहमदनगर शहरातील एका उपनगरात पतीला लाकडी दांडक्याने मारहाण करून गळा दाबून जीवे ठार मारण्याच्या प्रयत्न झाला. तसेच घरात घुसून पत्नीचा विनयभंग करण्यात आला. शासकीय जागेमध्ये केलेल्या अतिक्रमबाबत अर्जाच्या अनुषंगाने तलाठी कार्यालयातील व्यक्ती सोबत पाहणी करीत असताना हा प्रकार घडला.
या प्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिसांत मारहाण, शिवीगाळ करणार्या पती-पत्नीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सचिन किसन पवार, राणी सचिन पवार अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
सचिन पवार याने मोकळ्या जागेत अतिक्रमण करून फिर्यादी यांच्या कुटुंबास जाण्या-येण्यास अडथळा निर्माण केला आहे. या संदर्भात पोलीस अधीक्षकांकडे अर्ज करण्यात आला आहे. शुक्रवारी दुपारी फिर्यादी यांचे पती तलाठी कार्यालयातील व्यक्तीसोबत सचिन पवार याने केलेल्या शासकीय जागेमधील अतिक्रमबाबत अर्जाच्या अनुषंगाने पाहणी करत असताना सचिन पवार त्याच्या कारमधून तेथे आला. त्याने कारमधून लाकडी दांडके काढून फिर्यादीच्या पतीला शिवीगाळ करत मारहाण केली. जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने गळा दाबला. फिर्यादी घरामध्ये असताना घरात प्रवेश करून त्यांचा विनयभंग करत जीवे ठार मारण्याची धमकी दिली. राणी पवार हीने सुध्दा शिवीगाळ करत धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.