हमाली, तोलाई आणि वाराई कपाती संदर्भात सर्वमान्य तोडगा निघेपर्यंत माथाडी-मापारी कामगार वजन मापाच्या कामापासून दूर झाल्यामुळे नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्यासह कृषीमालाचे लिलाव काही दिवसांपासून ठप्प आहेत. आचारसंहितेत प्रचलित पध्दतीनुसार ही प्रक्रिया पार पाडावी, असे आवाहन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी केले. तथापि, त्यास व्यापारी वर्गाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही.
हमाली, तोलाई, वाराईसह लेव्हीचा वाद अनेक वर्षांपासून सुरू आहे. लेव्हीच्या वसुलीसाठी माथाडी कामगार मंडळाने १२०० ते १४०० व्यापाऱ्यांना नोटीसा काढल्या होत्या. या विरोधात व्यापारी संघटनेने न्यायालयात अपिल करीत स्थगिती मिळवली. नंतर व्यापाऱ्यांनी हमाली, तोलाई कपात करायची नाही, त्यामुळे लेव्ही चा प्रश्न उद्भवणार नसल्याचे निश्चित केले. यामुळे माथाडी-मापारी दैनंदिन कामकाजापासून दूर झाले. बाजार समित्यांनी पुढील सूचना येईपर्यंत लिलाव बंद ठेवण्याचे जाहीर केले. यामुळे सोमवारी बाजार समित्यांमध्ये लिलाव होऊ शकले नाही.
या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात व्यापारी, माथाडी कामगार संघटनेचे पदाधिकारी, कामगार उपायुक्त, सहकार विभाग यांची संयुक्त बैठक बोलावली होती.
लेव्हीबाबत न्यायालय अथवा शासकीय पातळीवर निर्णय होत नाही, तोवर माथाडी मंडळाने व्यापाऱ्यांना दिलेल्या नोटीसला अर्थ नाही. याबाबत काय सुधारणा करायची, त्याचे अधिकार शासनाला आहेत. त्यामुळे प्रचलित पध्दतीचा अवलंब करून लिलाव सुरू करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी शर्मा यांनी केले.व्यापाऱ्यानी बाजार समितीच्या माध्यमातून कामकाज सुरू करण्याची तयारी दर्शविली. परंतु, हमाली, वाराई व तोलाई रोखीने कपात करू, असे त्यांनी स्पष्ट केले. ही बाब कायद्यानुसार नसल्याचे बाजार समित्यांचे म्हणणे होते. लेव्हीचा विषय न्यायप्रविष्ट आहे. असे असताना माथाडी मंडळाने नोटीस कशा दिल्या, असा प्रश्न व्यापारी वर्गाने उपस्थित केला. आम्हाला न्याय दिला जात नाही. हवेतर आम्ही परवाने रद्द करतो, पण वारंवार अन्याय सहन करणार नाही, अशी तीव्र प्रतिक्रिया व्यापारी वर्गातून उमटली. बैठकीत कुठलाही तोडगा न निघाला नाही.
Edited by -Ratnadeep Ranshoor