Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

इंदुरीकर महाराजांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे औरंगाबाद खंडपीठाचे आदेश

indurikar maharaj
, शुक्रवार, 16 जून 2023 (13:22 IST)
इंदुरीकर महाराजांविरोधात गुन्हा दाखल करा, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत.या प्रकरणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या अॅड. रंजना गवांदे यांनी अॅड. जितेंद्र पाटील यांच्यासह याचिका दाखल केली होती.
 
अॅड. जितेंद्र पाटील यांनी बीबीसी मराठीला सांगितलं की, "संगमनेर सत्र न्यायालयानं इंदुरीकरांना दिलासा दिला होता. गुन्हा दाखल करू नका, असं म्हटलं होतं. सत्र न्यायालयाचा तो निकाल औरंगाबाद खंडपीठानं फेटाळला आहे. त्यामुळे इंदुरीकरांवर गुन्हा दाखल होईल."
 
याआधी PCPNDT कायद्यानुसार इंदुरीकर महाराजांविरोधात संगमनेर न्यायालयात दाखल खटला रद्द करण्यात आला होता. त्यानंतर याप्रकरणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती.
 
या याचिकेवर आज ( 16 जून 2023 ) सुनावणी झाली.
 
रंजना गवांदे यांनी आजच्या निर्णयावर बीबीसी मराठीशी बोलताना म्हटलं की, "इंदुरीकरांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे निर्देश औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. इंदुरीकरांचे ते वक्तव्य समाजाचं स्वास्थ्य बिघडवणारं आहे. कायद्याच्या विरोधात आहेत. त्याविरोधात आपला लढा आहे आणि त्याला आता यश आलं आहे."
 
प्रकरण काय?
'सम तारखेला संबंध ठेवल्यास मुलगा आणि विषम तारखेला स्त्रीसंग केल्यास मुलगी होते,' असं विधान इंदुरीकर महाराजांनी केलं होतं. त्याविरोधात अहमदनरगच्या जिल्हा व सत्र न्यायालयात खटला दाखल करण्यात आला होता.
 
सत्र न्यायालयानं हा खटला रद्द करण्याचा आदेश दिल्यानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. यामध्ये इंदुरीकर महाराजांसह सरकारी पक्षालाही प्रतिवादी करण्यात आलं होतं.
 
या कीर्तनाचे व्हीडिओ युट्यूबवर प्रसिद्ध झाले होते. तेच पुरावे म्हणून अंधश्रद्धा निर्मूलन समितीने सादर केले होते.
 
गुन्हा दाखल होताच इंदोरीकर महाराजांना हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आलं होतं.
 
याविरोधात इंदोरीकर महाराजांनी आपल्या वकीलामार्फत संगमनेरच्या जिल्हा सत्र न्यायालयात आव्हान देत सदर खटला रद्द करण्यासाठी धाव घेतली होती.
 
यात इंदुरीकर महाराजांसह सरकारी पक्ष आणि अंनिसने युक्तिवाद केल्यानंतर सदर खटला रद्द करत जिल्हा सत्र न्यायालयाने इंदुरीकर महाराजांना दिलासा दिला होता.
 
निकाल देताना डॉ. बालाजी तांबे खटला आणि धार्मिक ग्रंथांचा आधार घेण्यात आला होता. खटला रद्द झाल्याने इंदुरीकर महाराजांच्या समर्थकांनी पेढे वाटून आनंद व्यक्त केला होता.
 
पण, अपप्रवृत्तींच्या विरोधातील ही लढाई आहे. पीसीबीएनडीटी कायद्याचं हे उल्लंघन आहे, असं म्हणत अंनिसने या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला, असं अॅड. गवांदे यांनी म्हटलं होतं.
 
दरम्यान आजच्या निकालाविषयी, इंदुरकरांची बाजू मांडणाऱ्या वकिल राधिका नावंदर यांनी बीबीसी मराठीला सांगितलं की, “मी सध्या कोर्टात आहे. अजून ऑर्डर आली नाही. दुपारी ऑर्डर वाचून मी याविषयी सांगू शकेल.”
 
इंदुरीकर महाराज कोण आहेत?
निवृत्ती देशमुख म्हणजेच इंदुरीकर महाराज हे नाव आता घरोघरी ओळखीचं झालं आहे. खेडोपाड्यात कीर्तनं करून हसत हसत लोकांना चार आध्यात्मिक गोष्टी सांगणारे इंदुरीकर महाराज युट्यूबमुळे शहरांमध्येही पोहोचले आहेत.
 
निवृत्ती देशमुख यांचा 9 जानेवारी 2019ला 48वा अभीष्टचिंतन सोहळा पार पडला. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील इंदोरी हे त्यांचं गाव. या गावाच्या नावावरूनच त्यांना पुढे चालून इंदोरीकर या नावानं ओळखलं जाऊ लागलं. पुढे 'इंदोरीकर'चा अपभ्रंश 'इंदुरीकर' असा झाला आणि आता ते इंदुरीकर याच नावाने ओळखले जातात.
 
राज्यभरातल्या राजकीय नेत्यांच्या अभीष्टचिंतनानिमित्त इंदुरीकरांच्या कीर्तनाचं आयोजन केलं जातं. इंदुरीकरांच्या कीर्तनाची लोकप्रियता इतकी आही की त्यांची तारीख मिळण्यासाठी लोक वर्षानुवर्षं वाट पाहतात.
 
इंदुरीकरांबाबत काय आक्षेप आहेत?
इंदुरीकरांच्या कीर्तनातील अनेक वक्तव्यं ही महिलांचा अपमान करणारी असतात, असा आक्षेप महिलांकडून व्यक्त केला जातो.
 
यामुळे काही गावांमध्ये त्यांच्या कीर्तनावेळी गोंधळही निर्माण झाला होता.
 
इंदुरीकरांनी महिलांबाबत अनेक वादग्रस्त विधानं केली आहेत. ती अशी-
 
* "चप्पल कितीही भारी झाली म्हणून काय गळ्यात घालतो का? अहो चप्पल कुठं शोभती? बायको आहे ती. तिनं त्या मापात असावं."
* "पोरीच्या अंगात जितके कपडे कमी, तितकी पोरगी फटकावली पाहिजे."
* "नोकरीवाल्याच्या बायकांनो सांगा, काय काम करता तुम्ही? लाज धरा लाज."
* "नवरदेवापुढे पोरीनं नाचायला सुरुवात केली लग्नात, अरे खानदान तपासा आपले कोणते आहेत?"
* "पालकांनी जरा आपल्या मुलींचे हात तपासा. बांगडी आहे का बघा. की बुडवला धर्म?"
* "पोरीयलाबी अकली नाही राहिल्या. कुणावरबी प्रेम करायला लागल्या. आम्ही एका वर्गात होतो आणि प्रेम झालं म्हणे. कानफाड फोडलं पाहिजे."
* "गोरी बायको करू नये, कारण ज्यांनी ज्यांनी गोऱ्या बायका केल्या त्यांच्या बायका निघून गेल्या."
 
इंदुरीकर आणि समर्थकांंचं म्हणणं काय?
इंदुरीकरांवरील या आक्षेपांवर त्यांच्या समर्थकांचं काय म्हणणं आहे ते बीबीसी मराठीनं जाणून घेतलं होतं.
 
भारतीय संस्कृती टिकावी म्हणून इंदुरीकर असं बोलतात, असं इंदुरीकरांच्या समर्थकांनी म्हटलं होतं.
 
तुमच्या कीर्तनातील भाषा आणि मुद्दे समजून सांगण्याची पद्धत महिलांना खटकते, या प्रश्नावर इंदुरीकर महाराज बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाले होते, "प्रत्येक माणूस वेगळाच विचार करणार ना. आपला दृष्टिकोन तो तर नाहीये ना."
 
Published By- Priya Dixit 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

प्रशिक्षणा दरम्यान दोन सीआरपीएफ जवानांच्या छातीत दुखू लागले, दोघांचा मृत्यू