माजी मंत्री बच्चू कडू हे त्यांच्या बेधडक आणि सडेतोड स्वभावासाठी ओळखले जातात. बच्चू कडूंच्या विधानांमुळे अनेकदा मित्रपक्षांची पंचाईत ही झाल्याचे दिसून आले आहे. आता बच्च कडू थेट सचिन तेंडुलकरला नोटीस धाडणार आहे. 30 ऑगस्टला कडू त्यांच्या वकिलाकरवी तेंडुलकरला कायदेशीर नोटीस पाठविणार आहेत.
सचिनने ऑनलाईन जाहिरातीतून माघार घ्यावी, नाहीतर त्यांचा घरासमोर आंदोलन करु, असा इशारा बच्चू कडू यांनी दिला होता. बच्चू कडू यांनी यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना याबाबत पत्र दिलं होते. मात्र कोणतीही कारवाई झाली नाही.
काय म्हणाले बच्चू कडू?
आमदार बच्चू कडू म्हणाले की, भारतरत्न सचिन तेंडुलकर हे ऑनलाईन गेमबाबतची जाहिरात करतात. त्यामुळे युवा पिढी अशा खेळांकडे आकर्षित होते. पैशासाठी अशी जाहिरात करणे योग्य नाही. त्यांनी अशा जाहिराती करु नये अशी आम्ही त्यांना यापूर्वी विनंती केली आहे. त्यांच्या व्यक्तिमत्वामुळे युवा वर्ग प्रभावित होतो, असे कडू यांनी स्पष्ट केले आहे. आपण सचिन तेंडुलकर यांना दिलेला वेळ संपत आलेला असून वकिलाकडून नोटीस पाठवण्याची तयारी पूर्ण करण्यात आलीय. 30 ऑगस्ट रोजी नोटीस पाठवण्यात येईल.
सचिन तेंडुलकरने आपल्या वडिलांना वचन दिल्यामुळे आपण आजपर्यंत पानमसाला, गुटखा, तंबाकू यांच्या जाहिराती केल्या नसल्याचे जाहीरपणे म्हटले आहे. मात्र, तरीही त्याने केलेल्या एका जाहिरातीवरून बच्चू कडू संतप्त झाले आहेत. त्याने ऑनलाईन गेमची जाहिरात केली आहे. या जाहिरातीलाच आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेचा विरोध आहे. बच्चू कडूंच्या राजकीय धोरणांची माध्यमांमध्ये कायमच चर्चा असते. पण आता थेट भारतरत्न सचिन तेंडुलकरलाच ते नोटीस पाठवणार असल्यामुळे त्यांची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे.
Edited By - Ratnadeep Ranshoor