"हा माझ्यासाठी महत्त्वाचा क्षण आहे. मी बाळासाहेबांना पुन्हा एकदा वंदन करतो. बाळासाहेबांनी कधी शब्द फिरवला नाही. आम्ही कमिटमेंट त्यांच्याकडून शिकलो", असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
विधिमंडळात बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राच्या अनावरणप्रसंगी ते बोलत होते. शिवसेना प्रमुखांमुळे माझ्यासारखे असंख्य शिवसैनिक विधानसभा, विधानपरिषदेपर्यंत पोहोचू शकले.
भाषणात मुख्यमंत्री म्हणाले, "सगळ्यांनी भाषणात चौकार षटकार मारलेत त्यामुळे माझी पंचाईत झालीय. बाळासाहेबांच्या विचारांवर प्रेम करणा-या प्रत्येकासाठी हा क्षण अनमोल आहे त्याचं मोल करता येणार नाही".
"एकेकाळी महाराष्ट्रात ठराविक घराण्यांची सत्ता होती. पण बाळासाहेबांनी सामान्य घरातल्या मुलांना संधी दिली. बहुसंख्य शिवसेनेच्या नेत्यांना राजकीय पार्श्वभूमी नाही. हे केवळ बाळासाहेबांनी केलं. नाहीतर एखाद्या शेतकऱ्याचा मुलगा राज्याचा मुख्यमंत्री कसा झाला असता. त्यांच्या विषयी बोलताना कंठ दाटून येतो. कारण त्यांच्यामुळे इथपर्यंत प्रवास झालाय", असं मुख्यमंत्री म्हणाले.
"बाळासाहेब ठाण्यात यायचे तेव्हा म्हणायचे मला ठाण्याची काळजी नाही इकडे एकनाथ शिंदे आहेत. गेली 25 वर्षं ठाण्यात बाळासाहेबांच्या शिवसेनेची सत्ता आहे. तुमच्यात धाडस आणि आत्मविश्वास असेल तर कोणी तुम्हाला रोखू शकत नाही. हे बाळासाहेबांनीच आम्हाला शिकवलं आहे. तुम्ही हे पाहतच आहात"
"अजितदादा म्हणाले ते खरंय, एकदा मुस्लीम बांधव मातोश्रीवर आले होते. त्यांचा नमाज पढण्याची वेळ दिली. बाळासाहेबांनी त्यांना जागा दिली. पण पाकिस्तानचे गोडवे जे गात होते त्यांच्याबद्दल मी बोलू शकत नाही. काही गोष्टी मी मुख्यमंत्री असल्याने बोलू शकत नाही.
मुख्यमंत्री पदासाठी त्यांनी कधी विचारांशी तडजोड केलेली नाही. स्वत:ला काही पाहिजे म्हणून त्यांनी रिमोट कंट्रोल चालवला नाही याचे आम्ही साक्षीदार आहोत", असं मुख्यमंत्री म्हणाले.
आमच्यासाठी मुंबई मातृभूमी- उद्धव ठाकरे
"तुम्ही मुंबईला सोन्याचं अंडं देणार कोंबडी म्हणून बघतायेत. पण आम्ही ती आमची मातृभूमी म्हणून बघतोय", असं उद्धव ठाकरे म्हणाले.
"मोदी असले तरीही महाराष्ट्रात बाळासाहेबांशिवाय मत मिळू शकत नाही. तुम्ही मोदींचे फोटो लावून या, आम्ही बाळासाहेबांचे फोटो लावून येतो", असं उद्धव ठाकरे म्हणाले. बाळासाहेब ठाकरेंच्या जयंती निमित्ताने षष्णमुखानंद सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
मुंबई महानगर पालिकेच्या बॅंकेतील ठेवींकडे या लोकांचा डोळा आहे असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि शिंदे गटावर निशाणा साधला.
"दुसऱ्यांचे वडील चोरता चोरता स्वतचे वडील कोण ते लक्षात ठेवा. बाळासाहेबांचं तैलचित्र लावताय- आनंद आहे. पण तुमचा हेतू वाईट आहे", असं उद्धव ठाकरे म्हणाले.
"ज्यांनी तैलचित्र चितारलं आहे, त्यांना वेळ दिला का? एकीकडे म्हणतात बाळासाहेबांचे वारसदार, एकीकडे मोदींची माणसं, एकीकडे शरद पवारांना गोड माणूस म्हणतात- नक्की कोणाचे आहात. महाविकास आघाडी सरकार का मोडलं- तर हिंदुत्वाची कास सोडली म्हणे. काल म्हणतात शरद पवारांचं मार्गदर्शन घेतो. मग मी काय घेत होतो"?
"खोक्यांनी गद्दार विकत घेतले जाऊ शकतात पण हे जे आहे ते विकत घेतलं जाऊ शकत नाही. मला अमेरिकेचे अध्यक्ष भेटले. काळजीत दिसले. ते म्हणाले उद्या मी भाजपमध्ये चाललोय. राष्ट्राध्यक्षांच्या घरावर एपीआयने धाड टाकली. खोकेवीर यांनी सांगितलं, तू कसा जगणार. भाजपमध्ये ये. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मिंधे गटात गेले. ज्यांना जिकडे जायचंय, झोपेसाठी जायचंय त्यांनी तिकडेच झोपावं. उठूच नका", असं उद्धव ठाकरे म्हणाले.
त्यांनी पुढे सांगितलं, "प्रकाश आंबेडकर आपल्यासोबत आलेत. दोन नातू एकत्र आलेत. जे डोक्यावर बसतात त्यांना जा तू असं म्हणू. हिंदुत्वाच्या आडून देशावर पोलादी पकड बसवायची असा प्रकार सुरु आहे. काही वर्षांपूर्वी मी चीनला गेलेलो. दुभाष्याशिवाय चालत नाही. बीजिंगमध्ये ऑलिम्पिक होतं. एक दुभाषा होता. बीजिंगमध्ये अनवधानाने सरकारविरोधात बोललं तर दोन दिवसात गायब होते. मला जगायचं आहे. अशी पकड आपल्याकडेही आहे."
राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी दूर व्हायची इच्छा व्यक्त केलीये. फार उशीरा शहाणपण सुचलं. महाराष्ट्रद्वेष्टी माणूस... यापुढे सोडायचं नाही असं ठाकरे म्हणाले.
Edited by : Ratnadeep Ranshoor