चंद्रपूरचे खासदार बाळूभाऊ धानोरकर यांचे वयाच्या 48 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्यामुळे त्यांना दिल्लीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज मंगळवारी पहाटे त्यांचे उपचाराधीन असताना निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी आमदार प्रतिभा धानोरकर, दोन मुले असा परिवार आहे. बाळू धानोरकर यांचे पार्थिव दिल्लीहून वरोरा त्यांच्या निवासस्थानी आणण्यात येणार आहे.
बाळू धानोरकर यांना किडनी स्टोनच्या शस्त्रक्रियेसाठी नागपूरच्या रुग्णालयात उपचाराधीन होते. प्रकृतीत अस्वस्थता जाणवल्यामुळे त्यांना दिल्लीच्या मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले. चार दिवसांपूर्वीच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यांच्या अंत्यसंस्कराच्या वेळी ते उपचाराधीन होते. दिल्लीच्या मेदांतामध्ये बाळू धानोरकर यांनी आज अखेरचा श्वास घेतला.
त्यांचे पार्थिव आज दुपारी त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात येईल. त्यांच्यावर 31 मे रोजी सकाळी 10 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
बाळूभाऊ हे चंद्रपुरातील काँग्रेसचे खासदार होते. ते मुळात भद्रावती गावाचे होते.
शिवसेना स्थानिक शाखेचे प्रमुख, तालुका प्रमुख ते जिल्हाप्रमुख असा प्रवास करत 2014 साली ते आमदार म्हणून वरोरा विधानसभेतून निवडून आले. नंतर शिवसेनेतून 2019 मध्ये राजीनामा देऊन काँग्रेसकडून चंद्रपूर वर्णी आणि लोकसभा क्षेत्रातून खासदार म्हणून निवडून आले.