तब्बल १८ वर्षा पासून फरार असलेला आरोपीला गुन्हेशाखा युनिट क्र. १ ने जेरबंद केले आहे. नाशिकरोड पोलीस स्टेशन येथील भादवि कलम ३८०, ४६१ प्रमाणे दाखल असलेल्या गुन्हयातील आरोपी संतोष कारभारी मोहटे हा गुन्हा घडल्यापासून फरार होता. १८ डिसेंबर रोजी गुन्हेशाखा युनिट क. १ नाशिक शहर कडील नेमणुकीचे पोलीस उपनिरीक्षक जाकीर शेख हे गुन्हयातील आरोपींचा शोध घेत असतांना त्यांना खात्रीशीर गुप्त बातमी मिळाल्यानंतर नाशिकरोड पोलीस स्टेशन कडील गुन्हयातील आरोपी हा येवला तालुक्यातील धुळगाव येथे सापडला.
तो धुळगाव येथे लपून छपून येत असतो व तो आज त्यांच्या राहत्या घरी येणार अशी माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सोबत पोलीस अमलदार किरण शिरसाठ, प्रदीप म्हसदे, मुक्तार शेख यांना सोबत घेवून येवला तालुक्यातील धुळेगाव येथे जावून आरोपीच्या राहत्या घराजवळ सापळा रचण्यात आला. येथे आरोपीला शिताफीने ताब्यात घेण्यात आले. त्यांचेकडे नाशिकरोड पोलीस स्टेशनकडील गुन्हा संबंधाने विचारपूस करता त्याने सदरचा गुन्हा केल्याचे कबुल केला. त्यानंतर या गुन्हेगाराला नाशिक येथे आणून त्यास गुन्हयाचे पुढील तपासकरिता नाशिकरोड पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. सदरची कामगिरी पोलिस आयुक्त दीपक पाण्डेय्, गुन्हेशाखेचे पोलीस उपायुक्त संजय वारकुंड, गुन्हेशाखेचे सहा पोलीस आयुक्त वसंत मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक, दिनेश खैरनार, पोलीस उपनिरीक्षक जाकीर शेख, पोलीस अंमलदार किरण शिरसाठ, प्रदीप म्हसदे, मुक्तार शेख, प्रतिभा पोखरकर, तसेच गुन्हेशाखा युनिट कमांक १ कडील इतर सर्व पोलीस अमलदार यांनी केलेली आहे.