नाशिक बाजारामध्ये भेसळयुक्त गुळाची विक्री होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. शहरातील रविवार पेठेतून अन्न व औषध प्रशासनाने तब्बल ३ हजार किलो गुळ जप्त केला आहे. हा गुळ तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आला आहे.
रविवार पेठेतील रमेश ट्रेडिंग कंपनी या दुकानाची अन्न सुरक्षा अधिकारी अमित रासकर, अविनाश दाभाडे व योगेश देशमुख यांच्या पथकाने तपासणी केली. भेसळीच्या संशयावरून दुकानातील ३ हजार ६ किलो गुळ जप्त करण्यात आला हे. या गुळाची किंमत २ लाख ४० हजर ४८० रुपये एवढी आहे. गुळाचे नमुने विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. अहवाल प्राप्त होताच पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचे अन्न व औषध प्रशासनाने सांगितले आहे. सदर कारवाई सहायक आयुक्त (अन्न) श्री गणेश परळीकर व सह आयुक्त श्री चंद्रशेखर साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली आहे.