ओटवणे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शिक्षक शिक्षकेतर व अन्य कर्मचाऱ्यांचे ऑगस्ट महिन्याचे वेतन ३१ ऑगस्टपूर्वी करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी प्रशासनाला दिल्याची माहिती महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष गणेश नाईक यांनी दिली.
कोकणातील असंख्य शिक्षक, शिक्षकेतर व अन्य कर्मचारी गणेशोत्सवात मूळ गावी जातात. मात्र गेली दोन वर्षे कोरोनाचे संकट असल्यामुळे अनेक शिक्षक शिक्षकेतर व अन्य कर्मचारी गणेशोत्सवासाठी आपल्या मूळ गावी जाऊ शकले नाहीत. यावर्षी ३१ ऑगस्ट रोजी गणेशोत्सव असून त्याच्या पूर्व तयारीसाठी आणि हा सण आपल्या गावी साजरा करता यावा यासाठी या महिन्याचे वेतन २५ ऑगस्ट पूर्वी करावे अशी मागणी ३ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती. दरम्यान आमदार नागो गाणार यांनीही याबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व शालेय शिक्षणमंत्री यांच्याशी पत्रव्यवहार केला होता.