Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पावसाळ्यात वीजयंत्रणेपासून सतर्क राहा : महावितरणचे आवाहन

पावसाळ्यात वीजयंत्रणेपासून सतर्क राहा : महावितरणचे आवाहन
, बुधवार, 9 जून 2021 (17:29 IST)
वादळी व संततधार पाऊस किंवा पावसाळ्यातील अतिवृष्टी, पूर परिस्थिती, झाडे व फांद्या कोसळल्याने तुटलेल्या वीजतारा, विजेची उपकरणे किंवा यंत्रणेमधील शॉर्टसर्कीट आदींमुळे विद्युत अपघात होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सार्वजनिक व घरगुती वीजयंत्रणा, उपकरणांपासून सावध व सतर्क राहावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
 
दरम्यान, पूर किंवा अतिवृष्टीमुळे कोणत्याही क्षणी प्रतिकूल स्थिती, धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून रोहित्रांचा वीजपुरवठा बंद ठेवण्यात येतो. अशा स्थितीत नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
 
अतिवृष्टी, वादळी पाऊस आदींमुळे तुटलेल्या वीजतारा, वीजखांब, रस्त्याच्या बाजूचे फिडर पिलर, रोहित्रांचे लोखंडी कुंपण, फ्यूज बॉक्स तसेच घरातील ओलसर विद्युत उपकरणे, शेतीपंपाचा स्वीचबोर्ड, विद्युत यंत्रणेजवळील इतर ओलसर वस्तु, साहित्य आदींमुळे विद्युत अपघात होण्याची शक्यता असते. पाणी हे विजेचे वाहक असल्याने पावसाळयात विद्युत उपकरणांचा पाण्यापासून बचाव करणे आवश्यक असते.
त्यामुळे विद्युत अपघात टाळण्यासाठी खबरदारी घेणे व सतर्क राहणे अतिशय आवश्यक आहे. मुसळधार पाऊस व जोराचा वारा यामुळे झाडे व फांद्या वीजतारांवर पडतात. यामध्ये वीजखांब वाकतात. वीजतारा तुटतात. लोंबकळत राहतात. अशा वीजतारांमध्ये वीजप्रवाह असण्याची शक्यता असल्याने त्यापासून सावध राहावे. या वीजतारांना हात लावण्याचा किंवा हटविण्याचा प्रयत्न करू नये.
पावसाळ्यात घरातील स्वीचबोर्ड किंवा विजेच्या विविध उपकरणांचा ओलाव्याशी संपर्क येणार नाही याची खबरदारी घ्यावी. घरातील वीजपुरवठ्याला आवश्यक अर्थींग केल्याची खात्री करून घ्यावी. फ्यूज तार म्हणून तांब्याऐवजी अॅल्युमिनियम अलॉय ही विशिष्ट धातुची तार वापरली पाहिजे. त्यामुळे काही बिघाड झाल्यास वीजपुरवठा तात्काळ खंडित होतो व संभाव्य धोका टळतो.
घर किंवा इमारतीवरील दूरचित्रवाणीची डिश किंवा अॅण्टेना वीजतारांपासून दूर ठेवावे. ओल्या कपड्यांवर विजेची इस्त्री फिरवू नये. विजेचे स्वीचबोर्ड किंवा कोणत्याही उपकरणाला पाणी लागणार नाही, याची दक्षता घ्यावी. विजेवर चालणारे सर्व उपकरणे नेहमी स्वीचबोर्डपासून बंद करावे. विशेषतः टिनपत्र्याच्या घरात राहणाऱ्या नागरिकांनी पावसाळ्यात अतिदक्ष राहून विजेपासून सुरक्षित राहण्यासाठी उपाययोजना कराव्यात.
ग्रामीण भागात विजेच्या खांबांना जनावरे बांधू नयेत. त्यास दूचाकी टेकवून ठेवू नये. वीजतारांजवळ कपडे वाळत घालू नयेत. सार्वजनिक ठिकाणी असलेले फिडर पिलर्स, रोहित्र किंवा इतर वीजयंत्रणेपासून सुरक्षित अंतर ठेवावे. या यंत्रणेजवळ जाण्याचा प्रयत्न करू नये. त्याठिकाणी कचरा टाकू नये.
शहरी व ग्रामीण भागातील वीजग्राहकांसाठी महावितरणचे मध्यवर्ती ग्राहक सेवा केंद्राचे 1912 किंवा 1800-102-3435 किंवा 1800-233-3435 हे टोल फ्री क्रमांक 24 तास उपलब्ध आहेत. यासह मोबाईल अॅप, www.mahadiscom.in वेबसाईटद्वारेही तक्रारी स्विकारल्या जातात. वीजपुरवठा खंडित झाल्याची तक्रार करण्यासाठी महावितरणकडे नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावरून महावितरणच्या 022-41078500 या क्रमांकावर मिस्ड कॉल दिल्यास किंवा मोबाईल क्रमांकावरून NOPOWER<space><Consumer Number> हा ‘एसएमएस’ महावितरणच्या 9930399303 या मोबाईल क्रमांकावर पाठविल्यास तक्रार नोंदविली जाईल.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पावसाचे पाणी ट्रॅकवर साचल्याने मध्य आणि हार्बर रेल्वे वाहतूक ठप्प