Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मंत्रिपदाची इच्छा पूर्ण व्हावी भरत गोगावले यांचे देवीकडे मागणं

BHARAT GOGAWALE
, सोमवार, 1 जानेवारी 2024 (20:54 IST)
कोल्हापूर :राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र आले तर कोणाला आवडणार नाही? एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे एकत्र आले तर सगळ्यांना आवडेल, अशा शब्दात मनसे-शिवसेना संभाव्य युतीवर आमदार भरत गोगावले यांनी भाष्य केले. त्याचवेळी येणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रिपदाची इच्छा पूर्ण व्हावी, असे देवीकडे साकडे घातल्याचे आमदार गोगावले यांनी सांगितले.
 
शिवसेना नेते आमदार भरतशेठ गोगावले नववर्षाच्या पहिल्याच दिवशी कुटुंबियांसह अंबाबाई देवीच्या दर्शनाला कोल्हापुरात आले होते. यावेळी त्यांनी अंबाबाई मंदिरातल्या गाभाऱ्यात जाऊन मनोभावे पूजा केली. गोगावले यांच्या हस्ते कुंकुमार्चन विधीही झाला. दर्शनानंतर गोगावले यांनी कोल्हापुरातील पत्रकारांशी संवाद साधला.
 
शिंदे-राज ठाकरे एकत्र येणार का?
मनसेप्रमुख राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वाढलेली जवळीक पाहता, येत्या काळात दोन्ही पक्षांमध्ये काही राजकीय समीकरणे जुळून युती-आघाडी होईल का? असा प्रश्न सबंध महाराष्ट्राला पडला आहे. हाच प्रश्न गोगावले यांना विचारला असता ते म्हणाले, राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र आले तर कोणाला आवडणार नाही? हिंदुत्वासाठी काम करणारे दोन मराठी नेते एकत्र येत असेल तर आनंदच होईल, ही चांगली बाब आहे, असे ते म्हणाले.
 
गोगावले मंत्रिपदावर काय म्हणाले?
आई अंबाबाई चरणी प्रार्थना केली आहे. तीन वेळा आमदार झालो आहे, आता विजयी चौकारसुद्धा मारावा. शिवाय आता अपुरी मंत्रिपदाची इच्छासुद्धा पूर्ण व्हावी असे साकडं देवीला घातल्याचे गोगावले यांनी सांगितलं. त्याचवेळी या महिनाभरात मंत्रिमंडळ विस्तार होईल आणि त्यात माझं नाव असेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
ज्यांनी घोटाळे केले आणि आरोप सोमय्यांनी केले त्यावर, त्यांनाच प्रश्न विचारला तर बरं होईल.. घोटाळे आणि आरोप ते दोघांनाच माहिती, आम्हाला त्याबद्दल काहीही माहिती नाही.आम्ही काहीही केलेले नाहीये.त्यांनी काहीही बोलावे, आम्हाला काहीही फरक पडत नाही, असे गोगावले म्हणाले. त्याचवेळी सिंधुदुर्गमधील पाणबुडीचा प्रोजेक्ट कुठेही जाणार नाही असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितल्याचेही गोगावले म्हणाले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी आले अन्.......