Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीला अभिवादनाचे कार्यक्रम साधेपणाने करा – धनंजय मुंडे

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीला अभिवादनाचे कार्यक्रम साधेपणाने करा –  धनंजय मुंडे
, रविवार, 11 एप्रिल 2021 (11:31 IST)
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना साधेपणाने अभिवादन करण्याचे आवाहन सामाजिक न्यायमंत्री  धनंजय मुंडे यांनी केले आहे. जयंती उत्साहात आणि प्रथा परंपरेनुसार शासन स्तरावरही साजरी करण्यात येईल. मात्र, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोठेही गर्दी न करता, घराघरातूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले जावे, असे आवाहन  मुंडे यांनी केले आहे.
 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती हा उत्सव आणि आनंदाचा क्षण आहे. डॉ. आंबेडकर यांच्या विचारांचा सन्मान म्हणून या दिवशी शिस्तीचे पालन सर्वजण करूया, अशी अपेक्षाही श्री . मुंडे यांनी व्यक्त केली आहे.जयंती समन्वय समितीच्या वतीने १४ एप्रिल या जयंतीदिनी कोरोना विषाणूला रोखण्याच्या नियमावलीचे पालन करून कार्यक्रमांचे आयोजन केले जाईल, असा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या राज्यस्तरीय बैठकीत घेण्यात आला आहे. चैत्यभूमी स्मारक तसेच मुंबईतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वास्तव्य असणाऱ्या ठिकाणी गर्दी न करता अभिवादन केले जाईल. राज्यभरातील अनुयायांनाही जयंती साजरी करण्याच्या शासन परिपत्रकातील नियमावलींचे पालन करून साधेपणाने जयंती साजरे करण्याचे आवाहन धनंजय मुंडे यांनी केले आहे.
 
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चैत्यभूमी येथील स्मारक स्थळावरून अभिवादन कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे, यावर्षी सर्व आंबेडकरी अनुयायांनी याद्वारे घरा-घरातून अभिवादन करावे, बीआयटी चाळ, इंदूमिल तसेच डॉ. बाबासाहेबांचे वास्तव्य असलेल्या ठिकाणीही अभिवादन कार्यक्रम शासकीय नियमांचे पालन करून घेण्यात येणार आहे.कायम समाजहित अग्रस्थानी ठेवलेले संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर आमचे आदर्श आहेत, त्यांनी शिकवलेल्या समाजहिताच्या शिकवणीची आठवण ठेऊन, महाराष्ट्राची जनता व सबंध आंबेडकरी अनुयायी हा अभिवादनाचा कार्यक्रम अत्यंत शिस्तीत पार पाडतील असा विश्वासही  मुंडे यांनी व्यक्त केला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

देशात रेमडेसिवीरचा तुटवडा आणि भाजप कार्यालयात मोफत वाटले जातेय - नवाब मलिक