Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

भुजबळांचा दावा, महाराष्ट्रात जो चमत्कार झाला तो दिल्लीतही होईल

भुजबळांचा दावा, महाराष्ट्रात जो चमत्कार झाला तो दिल्लीतही होईल
, गुरूवार, 16 डिसेंबर 2021 (14:40 IST)
संपूर्ण देशभरात सर्वांना सोबत घेऊन जाण्याची ताकद राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार साहेब यांच्यात आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारचा चमत्कार झाला. तसाच चमत्कार सन २०२४ साली दिल्लीत होईल. त्यासाठी पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे असे आवाहन राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.
 
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त मुंबईत आयोजित व्हर्चुअल रॅली प्रसंगी ते बोलत होते. ते म्हणाले, देशात साहित्य, शिक्षण, विज्ञान, कला, क्रीडा यासह विविध महत्वाच्या क्षेत्रात पवार साहेबांचे मोलाचे योगदान आहे. क्रीडा क्षेत्रात त्यांनी केलेलं काम जगभरात गाजलं असून कुस्तीला आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचविण्याचे काम त्यांनी केलं. कृषी क्षेत्रात त्यांनी दिलेल्या विशेष योगदानामुळे आज देश अन्न, धान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला असून फळबाग लागवड क्षेत्रातही अग्रभागी आहे. त्यांच्या या विशेष योगदानामुळे आज जगभरात अन्न,धान्याची फळांची निर्यात आपण करू शकत असल्याचे त्यांनी सांगितले.
 
ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी आपले अहोरात्र प्रयत्न सुरु आहे. मात्र एकीकडे ज्यांनी सरकारमध्ये असतांना ओबीसींसाठी अध्यादेश काढला त्याच पक्षाचे पदाधिकारी कोर्टात या आरक्षणाला आवाहन देत आहे. यावरून विरोधकांची कथनी एक आणि करणी एक असून मु मे राम और बगल छुरी अशी भूमिका असल्याची टीका त्यांनी यावेळी केली. ते म्हणाले की, आज ओबीसी आरक्षणाला विरोध होत आहे. उद्या देशातील इतर आरक्षणाला देखील विरोध होईल. आरक्षण काढून टाकण्याचा छुपा प्रयत्न केला जात आहे. हा प्रयत्न उधळून लावण्याची सर्व ओबीसीसह इतर नागरिकांची जबाबदारी आहे. तुमच्या आरक्षणाला विरोध करणाऱ्याना येणाऱ्या निवडणुकीत खड्यासारखे बाजूला ठेऊन त्यांना आपल्या दारात उभं करू नका असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
 
व्हर्चुअल रॅली प्रसंगी नाशिक येथील राष्ट्रवादी भवन कार्यालयात जिल्हाध्यक्ष ऍड.रवींद्र पगार, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, प्रदेश पदाधिकारी दिलीप खैरे, नानासाहेब महाले, निवृत्ती अरिंगळे, बाळासाहेब कर्डक, महिला शहराध्यक्ष अनिता भामरे, नगरसेवक जगदिश पवार, समिना मेमन, सुषमा पगारे, नाशिक महानगरपालिका माजी विरोधीपक्षनेत्या कविता कर्डक आदी उपस्थित होते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पाकिस्तान दौऱ्यावर असलेल्या वेस्ट इंडिज संघात पुन्हा 'कोरोना ब्लास्ट', आणखी 5 खेळाडू पॉझिटिव्ह