लातूर : चाकुचा आणि पिस्टलसदृश्य हत्याराचा धाक दाखवून लातूर शहरातील व्यापारी राजकमल अग्रवाल यांच्या शहरालगत, कातपूर रोडवर असलेल्या घरावर लातूर जिल्ह्यातील आजपर्यंतचा सर्वात मोठा दरोडा टाकून दरोडेखोरांनी सुमारे अडीच कोटी रूपये रोख, एक ते दीड किलो सोनं असा ऐवज लुटन नेल्याने सबंध जिल्हाभरात उलट सुलट चर्चा चालू आहे. हा दरोडा चोरट्यांनी सिनेस्टाईल पध्दतीने घातला असल्याचे बोलले जात आहे. तसेच चोरटे हे कुख्यात दरोडेखोर असावेत असाही संशय व्यक्त केला जात आहे.
राजकमल अग्रवाल हे शहरातील मोठे व्यापारी आहेत. त्यांचे गोयल ट्रेडिंग हे फर्म आहे. त्यांच्या लातूर शहरालगत कन्हैय्या नगर/ रामचंद्र नगर, कातपूर रोड, लातूर येथे पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास चार ते पाच दरोडेखोर त्यांच्या घरात घुसले. घरात घुसताच त्यांनी राजकमल अग्रवाल यांना जागं केलं, त्यांच्या गळ्याला चाकू लावला, पिस्टल सदृश्य हत्याराचा धाक दाखविला. यावेळी घरात अग्रवाल, त्यांची पत्नी, मुलगा, सून असे चौघेजण होते. त्या सर्वांना दरोडेखोरांनी धमकी दिली. त्यांच्याकडील सर्व मोबाईल काढून घेतले. दरोडेखोरांना राजकमल अग्रवाल यांच्याकडून कपाट, लॉकरच्या चाव्या घेतल्या, एखाद्या प्रशिक्षीत सराईत गुन्हेगारांप्रमाणे अगदी थंड डोक्याने दरोडेखोरांनी घरातील सोने, रोख रूपये ताब्यात घेतले. जाताना दरोडेखोरांनी सीसीटीव्हीचा डीव्हीआर समजून व्हायफायचा बॉक्स नेला. जाताना दरोडेखोरांनी आम्ही बराच वेळ इथेच थांबणार आहोत. काही हालचाल करू नका, आरडाओरड करू नका, कोणाशी संपर्क साधू नका अशी धमकी दिली. दरोडेखोर 25 ते 30 वर्षे वयोगटातील होते. ते मराठीत बोलत असल्याने दरोडेखोर मराठी व आसपासचे अथवा माहितगार असावेत असा अंदाज आहे.
Edited by: Ratnadeep Ranshoor