Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

‘बीआयएस’चे नागपूरसह “या” ठिकाणी छापे; एक कोटींचे दागिने जप्त

‘बीआयएस’चे नागपूरसह “या” ठिकाणी छापे; एक कोटींचे दागिने जप्त
, सोमवार, 23 जानेवारी 2023 (22:25 IST)
मुंबई : भारतीय मानक ब्युरोने पुणे, मुंबई, ठाणे आणि नागपूर या चार मोठ्या शहरांमध्ये एकूण सहा ठिकाणी छापेमारी केली आहे. दागिन्यांसाठी बंधनकारक करण्यात आलेल्या हॉलमार्किंगच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. विशेष छापा आणि जप्ती मोहीम राबवून कोट्यवधी रुपयांचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.
 
भारतीय मानक ब्युरोने (BIS) नागपूर, पुणे, मुंबई व ठाणे येथे टाकलेल्या धाडीमध्ये नकली हॉलमार्कचा होलोग्राम असलेले सुमारे एक कोटी पाच लाखांचे दागिने जप्त करण्यात आले आहे. राज्यामध्ये नकली हॉलमार्क लावून सोन्याच्या दागिन्यांची विक्री केली जात असल्याची माहिती बीआयएसला मिळाली होती. त्यावरून नागपूर, पुणे, मुंबई व ठाणे येथे टाकलेल्या धाडीमध्ये नकली हॉलमार्कचा होलोग्राम असलेले सुमारे २.७५ किलोग्रॅम दागिने जप्त करण्यात आले आहे.
 
दरम्यान, छापे टाकण्यात आलेल्या ठिकाणी दागिन्यांसाठी बंधनकारक करण्यात आलेल्या हॉलमार्किंगच्या नियमांचा उल्लंघन करून ग्राहकांची फसवणूक केली जात असल्याचे बीआयएसचे लक्षात आले होते. त्यानंतर विशेष छापा आणि जप्ती मोहीम राबवून कोट्यवधी रुपयांचे दागिने जप्त करण्यात आले आहे. परंतु, बनावट हॉलमार्कचे दागिने तयार होतातच कसे?, बीआयएसच्या केंद्राला त्यासाठी जबाबदार धरायला हवे? असा सवाल स्थानिक ज्वेलर्स संचालकानी उपस्थित केला आहे.
 
नागपुरमध्ये इतवारीतील सराफा बाजारामध्ये एका ठिकाणी काल (दि. २२) बीआयएसच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला होता. त्या ठिकाणी वर्ष २०२१ पासून बंधनकारक करण्यात आलेल्या हॉलमार्किंग च्या नियमांचे उल्लंघन करून जुन्याच पद्धतीने ग्राहकांना सोन्याचे दागिने विकले जात होते. तसेच नियमबाह्य पद्धतीने दागिन्यांवर बीआयएसच्या लोगोसह शुद्धतेचे तपशील नमूद केले जात होते. रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती. त्याशिवाय मुंबई येथील प्रसिद्ध झवेरी बाजारामध्ये दोन ठिकाणी, मुंबईतील अंधेरी येथे एका ठिकाणी, ठाण्यामध्ये जांभळी नाक्याजवळ एका ठिकाणी, तर पुण्यामध्ये रविवार पेठेमधील एका ज्वेलर्सवर ही अशीच कारवाई करण्यात आली.
 
बीआयएसच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीप्रमाणे, १ जुलै २०२१ पासून ४० लाख पेक्षा जास्त वार्षिक उलाढाल असलेल्या प्रत्येक ज्वेलर्सच्या दुकानामधून विकल्या जाणाऱ्या प्रत्येक दागिन्यावर बीआयएसचा लोगो, त्या दागिन्यांची शुद्धता दाखवणारी माहिती, तसेच सहा अंकी युनिक आयडेंटिटी कोड बंधनकारक करण्यात आला आहे. ग्राहकांची फसवणूक होऊ नये या उद्देशाने हे नियम लागू करण्यात आले असून देखील अनेक ज्वेलर्स अद्यापही त्याचे पालन करत नाही. त्याच अनुषंगाने ही कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे ग्राहकांनी दागिने खरेदी करताना सराफा व्यवसायिकांकडून भिंग मागून त्या दागिन्यावर बीआयएसचा लोगो, दागिन्याची शुद्धता दर्शवणारी माहिती, तसेच सहा अंकी युनिक आयडेंटिटी कोड आहे की नाही हे तपासणे आवश्यक आहे. तसेच प्रत्येक खरेदी संदर्भात बिल घ्यावे असे आव्हान बीआयएसचे अधिकाऱ्यांनी केले आहे.
हॉलमार्कच्या नियमांमध्ये बदल
 
सोन्याची शुद्धता तपासण्यापूर्वी हे जाणून घेणे फार महत्त्वाचे आहे की, भारत सरकारने दागिन्यांवर हॉलमार्कच्या नियमांमध्ये केलेली सुधारणा १ जुलै २०२१ पासून देशभर लागू करण्यात आली आहे. नवीन नियमानुसार, दागिन्यांवर हॉलमार्किंगचे एकूण तीन गुण आहेत. पूर्वी हे ४ ते ५ होते. तीन गुणांमध्ये हॉलमार्क, शुद्धता ग्रेड आणि सहा अंकी अल्फान्युमरिक कोड असतात. सहा अंकी अल्फान्युमरिक कोडला एचयूआयडी म्हणतात. यामध्ये अक्षरे तसेच अंकांचा समावेश होतो. नवीन नियमांनुसार, देशात निर्मित प्रत्येक सोन्याच्या दागिन्यांना एक युनिक एचयूआयडी कोड दिलेला आहे. यामुळे दागिन्यांची शुद्धता तपासण्यात मदत होते.
Edited by : Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

ईश्‍वरी झुंज; महाराष्ट्राचा निसटता पराभव