उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे हा शिवसेनेतला संघर्ष सर्वोच्च न्यायालयात पोहचल्यानंतर आता भाजपनं यात उडी घेतली आहे.
एकनाथ शिंदेंच्या याचिकेवर सोमवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. महाविकास आघाडी, एकनाथ शिंदे गट आणि विधानसभा अध्यक्ष अशा तीन बाजूंच्या वकिलांनी यावेळी युक्तीवाद केला. सुप्रीम कोर्टात आता पुढील सुनावणी 11 जुलै 2022 रोजी होईल.
11 जुलैला अद्याप 14 दिवस बाकी असल्यानं भाजप नेमकं काय करणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. अशातच आता भाजपच्या गोटातील हालचाली वाढल्याचं दिसून येत आहे.
"भाजपच्या आमदारांना कधीही मुंबईत बोलवलं जाऊ शकतं. राज्यपाल त्यांना फ्लोअर टेस्टसाठी कधीही बोलवू शकतात. त्यांच्याकडे तो अधिकार आहे. भाजपकडे बहुमताचा आकडा आहे," असं विश्वसनीय सूत्रांनी बीबीसी मराठीला सांगितलं आहे.
मुख्यमंत्र्यांनी दोन वेळा राजीनामा देण्याची तयारी केली होती, पण शरद पवारांसोबतच्या बैठकीनंतर त्यांनी राजीनामा दिला नाही, असंही भाजपच्या सूत्रांनी सांगितलं आहे.
भाजप नेते काय म्हणतात?
"सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत राज्यामधील राजकीय परिस्थितीचं आकलन करण्यात आलं. राज्यासमोरचे राजकीय प्रश्न लक्षात घेऊन भाजप आपली भूमिका ठरवेल, यावर आजच्या बैठकीत शिक्कामोर्बत करण्यात आलं," असं भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.
"आजच्या भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत सरकार स्थापनेच्या प्रस्ताबाबत चर्चा झालेली नाही. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्याकडून कोणताही प्रस्ताव आलेला नाही. आम्हाला आज तरी फ्लोअर टेस्टची मागणी करण्याची गरज वाटत नाही. पुढे होणाऱ्या घडामोडींवरून निर्णय घेण्यात येईल. भाजप सध्या वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहे,"असंही ते म्हणाले.
मुंबईत सोनवारी भाजपच्या कोअर कमिटीची बैठक झाली. त्यानंतर ते बोलत होते. यावेळी भाजपच्या आमदारांना राज्य किंवा देशाबाहेर न जाण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती मुनगंटीवार यांनी दिली आहे.
बहुमताचा आकडा
शिंदे समर्थक शिवसेनेचे 38 आमदार भाजपसोबत गेल्यास सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा होईल. पण, शिंदे समर्थक शिवसेनेचे आमदार गैरहजर राहिल्यास बहुमताचा आकडा असा असू शकेल.
भाजप आणि इतर पक्ष -
भाजप आणि मित्र पक्ष - 113
बविआ - 3
शेकाप - 1
शिंदे गटातील 10 अपक्ष आमदार + 2 आमदार (देवेंद्र भूयार, संजयमामा शिंदे)
एकूण - 129
महाविकास आघाडी -
शिवसेना - 14
काँग्रेस - 44
राष्टवादी काँग्रेस - 51