रावेर लोकसभा मतदारसंघाच्या भाजप खासदार रक्षा खडसे यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. बुधवारी रक्षा खडसे यांची प्रकृती बिघडल्याने त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. मुक्ताईनगर येथील खासदार कार्यालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे. रक्षा खडसे यांची प्रकृती सध्या स्थिर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
खासदार रक्षा खडसे यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी कोरोना चाचणी करण्याचं आवाहन करण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यातून त्या बऱ्या झाल्या होत्या. रक्षा खडसे यांनी तीन दिवसांपूर्वी वाढीव वीज बील, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरुन मुक्ताईनगर येथे आंदोलन केले होते. त्यानंतर त्यांची प्रकृती बिघडली होती.
आपली कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती खडसे यांनी ट्विट करून दिली आहे. ट्विटमध्ये म्हटले आहे, रात्री अचानक प्रकृती बिघडल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार कोविड टेस्ट केली असता; माझा टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आला, तरी गेल्या आठ दिवसांत माझ्या प्रत्यक्ष संपर्कात आलेल्यांनी स्वतःची कोविड चाचणी करुन घ्यावी. माझी प्रकृती स्थिर असून आपण सर्वांनी स्वत:च्या प्रकृतीची काळजी घ्यावी.