राज्यातील सत्तांतर नाट्याचा दुसरा अंक आता सुरू झाला आहे. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर सेनेचे बंडखोर एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पक्षाने आता सरकार स्थापनेसाठी हालचाली सुरू केल्या आहेत. नव्या सत्तेमध्ये बंडखोर गटाला आणि अपक्षांना किती मंत्री पदे मिळतात याची अनेकांना उत्सुकता आहे. तसेच कोणाला मंत्रिपद मिळणार याची देखील शक्यता वर्तवित सर्वत्र चर्चा सुरू आहे.
देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचा १ जुलै रोजी शपथविधी होण्याची शक्यता आहे. यापूर्वी ३ जुलैचा मुहूर्त निश्चित करण्यात आला होता, परंतु आता तारखेत बदल होऊ शकतो असे सूत्रांकडून कळते. फडणवीस आणि शिंदे आज किंवा उद्या राज्यपालांची भेट घेऊन सत्तास्थापनेचा दावा करतील, असेही सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता भाजप आणि शिंदे गटातील सत्तेचं वाटप कसं असणार? या संदर्भात जोरदार चर्चा सुरु आहे.
नव्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री, सेनेतील बंडखोर आठ आमदारांना मंत्रीपदे, महामंडळांवरही शिंदे समर्थकांची वर्णी लागणार असल्याचे सांगितले जाते. फडणवीसांकडे नगरविकास आणि गृहखाते तर शिंदे यांच्याकडे महसूल आणि सार्वजनिक बांधकाम खाते असण्याची शक्यता आहे. अर्थ खाते सुधीर मुनगंटीवार, दादा भुसेंकडे कृषी तर उदय सामंत यांच्याकडे उच्च शिक्षण खाते ठेवले जाण्याची शक्यता आहे. बच्चू कडू, शंभुराजे देसाई आणि अब्दुल सत्तार यांचे प्रमोशन होत त्यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळणार असल्याची जोरदार चर्चा आहे. भाजपकडे २९ तर शिंदे गटाकडे १३ मंत्रिपदे असण्याची शक्यता आहे. त्यात ८ कॅबिनेट आणि ५ राज्यमंत्रिपदांचा समावेश आहे.
भाजपातील आमदार असे मंत्री
देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनंगटीवार, प्रवीण दरेकर, गिरीश महाजन आशिष शेलार, गोपीचंद पडळकर, चंद्रशेखर बावनकुळे, राम शिंदे, नितेश राणे.
बंडखोर गट मंत्रीपद
एकनाथ शिंदे, दीपक केसरकर, उदय सामंत, दादा भुसे, संदीपान भुमरे, गुलाबराव पाटील, बच्चू कडू, संजय राठोड, अब्दुल सत्तार, शंभुराज देसाई, प्रताप सरनाईक, राजेंद्र पाटील यड्रावकर, प्रकाश आबिटकर, संजय रायमुलकर, संजय शिरसाट यांचा समावेश होणार असल्याचे सांगण्यात येते.