छ. संभाजीनगर : मुंबई उच्च न्यायालयाच्या वैयक्तिक सहायक पदाच्या परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा प्रकार काल घडला. या पदासाठी मुंबई, छत्रपती संभाजीनगर, नागपूर येथील सेंटरवर परीक्षा घेण्यात आली. या प्रकरणी टेलिग्राम आणि व्हॉटसअपवर एका चॅनलच्या अॅडमिनच्या विरोधात सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
मुंबई उच्च न्यायलयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या एका उच्चपदस्थ अधिका-याने दिलेल्या तक्रारीनुसार न्यायाधीशांच्या स्वीय सहायकाच्या पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली. त्यात छत्रपती छत्रपती संभाजीनगर येथे लघुलेखन चाचणी नऊ बॅचमध्ये (परिशिष्ट ब) आयोजित केली होती. यात श्रुतलेखन परीक्षेतील मजकूर एका उमेदवाराच्या मोबाइलवर पाहिल्याची माहिती दिली. त्यावरून खळबळ उडाली असून, पेपर फुटल्याने परीक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
Edited by -Ratnadeep Ranshoor