स्वयंपाक करण्यावरून झालेल्या वादावरून एका व्यक्तीने दुसऱ्याची निर्घृण हत्या केल्याची घटना गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तालुक्यातील अंजोरा गावात घडली आहे. या हत्येमध्ये वापरण्यात आलेले हत्यार पोलिसांनी जप्त करून आरोपीला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हत्येचे कारण स्वयंपाक वरून झालेला वाद आहे.शेर सिंग मंगलसिंह उईके असे या मयत व्यक्तीचे नाव आहे. मयत वागताळा तहसील लामटा, जिल्हा बालाघाट येथील रहिवासी आहे. तर आरोपीचे नाव बादल उर्फ रामचरण राम प्रसाद उईके रा.वागताळा तहसील लामटा, जिल्हा बालाघाट आहे. हे दोघे मजुरी करायचे.
अंजोरा गावातील एका शेतात ठेकेदारांचा बांबू डेपो असून शेतात लेबर क्वार्टर असून हे दोघे तिथे राहायचे.
सदर घटना 26 जून रोजी घडली. हे दोघे मजूर एकत्र राहत असून त्यांच्या मध्ये बिर्याणी बनवण्यावरून वाद झाला. बादल ने शेरसिंग ला आज स्वयंपाक करण्याची पाळी तुझी आहे. अशी आठवण करून दिली.मात्र शेरसिंग ने स्वयंपाक करण्यास नकार दिला. या वरून दोघांमध्ये वाद झाला. बादलला राग आला आणि त्याने धारदार शस्त्र घेऊन शेरसिंगच्या छातीत आणि डोक्यावर मारले त्यामुळे शेरसिंगचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेहाचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला. आरोपीने खुनाची कबुली दिली.आमगाव पोलीस ठाण्यात आरोपी बादल उर्फ रामचरण उईके याच्याविरुद्ध कलम 302 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला अटक करण्यात आली आहे.