आनंदवली येथील रमेश मंडलिक खून प्रकरणात शहर पोलिसांनी मोक्कांतर्गत केलेल्या कारवाईविरोधात बांधकाम व्यावसायिक बाळासाहेब बारकू कोल्हे यांनी दाखल केलेली याचिका गुरुवारी (दि. १२) मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, उच्च न्यायलयाने गुन्ह्याच्या तपासाच्या कागदपत्रांचे तसेच तपास अधिकारी सहायक आयुक्त समीर शेख यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्राचे अवलोकन केले. मंडलिक खून प्रकरणात संघटित गुन्हेगार टोळीने कट रचून खून केला होता.
या गुन्ह्यात बांधकाम व्यावसायिक बाळासाहेब कोल्हे यांचाही सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या गुन्ह्याचा मास्टरमाइंड रम्मी राजपूत याच्यासह सचिन मंडलिक,अक्षय मंडलिक,भूषण मोटकरी,सोमनाथ मंडलिक, दत्तात्रेय मंडलिक,नितीन खैरे,आबासाहेब भडांगे,भगवान चांगले,बाळासाहेब कोल्हे गणेश काळे,सागर ठाकरे, वैभव वराडे,जगदीश मंडलिक,मुक्ता मोटकरी अशांनी गुन्ह्याचा कट रचून रमेश मंडलिक यांचा खून केल्याचा आरोप आहे.
तपासादरम्यान सदरचा गुन्हा संघटित टोळीने केल्याचे स्पष्ट झाल्याने पोलिस आयुक्त दीपक पांडेय यांनी टोळीच्या या सदस्यांवर मोक्का कायद्यान्वये कारवाई करण्याचे आदेश दिले होते.या गुन्ह्याचा तपास सहायक आयुक्त समीर शेख करत आहेत.न्यायालयाच्या आदेशात बाळासाहेब कोल्हे हा भूमाफिया टोळीतील रम्मी राजपूत याचा मार्गदर्शक असल्याचे नमूद केले तसेच टोळीच्या आर्थिक फायद्यासाठी लॅण्ड ग्रॅबिंगसाठी हिंसाचार, धाकधपटशा व जबरदस्ती करून निष्पाप भूधारकांच्या जमिनी बळकवण्याकामी अग्रभागी असून टोळीसाठी आर्थिक पुरवठा करणारा सदस्य आहे.
तसेच टोळीतील एखाद्या सदस्याचा जरी गुन्हा करण्यात प्रत्यक्ष सहभाग नसला तरी त्याचा प्रत्यक्ष गुन्हा करणाऱ्या संघटित टोळीशी व सदस्यांशी संबंध असेल तर तो संबंध गुन्हेगारी टोळीकडून गुन्हा करण्यासाठी वापरला जात असेल तर त्याच्याविरोधात मोक्का कायद्यातील तरतुदींप्रमाणे कारवाई करता येईल, असे उच्च न्यायालयाने नमूद केले. या गुन्ह्याचे अवलोकन करत गुन्ह्याच्या तपासात याचिकाकर्ता बाळासाहेब कोल्हे यांची याचिका फेटाळली. या आदेशाने भूमाफियांना पुन्हा एकदा झटका बसला आहे.