वडील लग्न लावून देत नसल्यामुळे मुलानं स्वत:च्याच वडिलांची हत्या केल्याचं प्रकरण समोर आलं आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील जळगांव जामोद तालुक्यातील पिंपळगाव काळे शिवारात ही घटना घडली आहे.
मयूर हरिभाऊ तायडे यांच्या वीटभट्टीवर भैड्या नावाचे कुटुंब काम करत होते. घरगुती वादातून भैड्या कुटुंबातील पिता-पुत्रांमध्ये भांडण झाले.
वादानंतर भावसिंग भैड्या (वय 40) याने स्वतःचे वडील नानसिंग पहाडसिंग भैड्या (वय 60) यांच्या डोक्यात बांबूच्या काठीने वार करून त्यांचा खून केला.
या घटनेची माहिती मजुरांनी वीटभट्टी मालकाला दिली. वीटभट्टी मालकाने घटनेची माहिती जळगांव जामोद पोलिसांना दिली.
Published By -Smita Joshi
त्यानंतर जळगांव जामोद पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवला.
जळगांव जामोद येथील पोलीस स्टेशनमध्ये आरोपी भावसिंग भैड्या विरुद्ध भारतीय दंड संहितेनुसार खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.
पोलिस काय म्हणाले?
जळगाव जामोद येथील पोलिस स्टेशनचे पोलिस उप-निरीक्षक दिनेश झांबरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, “नानसिंग भैड्या हे वीटभट्टीवर काम करत होते. दहा दिवसांपूर्वी त्यांचा मुलगा भावसिंग भैड्या त्यांच्याकडे राहायला आला होता.
"या भावसिंगनं 31 मार्च रोजी रात्री जवळपास साडे आठ वाजता त्याच्या वडिलांशी लाडी करुन देण्याच्या कारणावरुन, लाडी म्हणजे बायको, बायको करुन देण्याच्या कारणावरून भांडणं केलं.
“त्यानं वडिलांना बांबू-दांड्यानं मारहाण करुन, त्यांना खाली पाडून, लाथा बुक्क्यानं मारहाण केली आणि तो त्यांच्या मृत्यूस कारणीभूत झाला.”
याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनीआरोपीला ताब्यात घेतलं आहे आणि पुढील तपास पोलिस करत आहेत.