राज्यात राजकीय भूकंप आला असून राष्ट्रवादी पक्षातील नेते अजित पवार यांनी विरोधी पक्षनेत्याचा राजीनामा देत शिंदे- फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. आज झालेल्या मंत्री मंडळाच्या बैठकीत त्यांनी आपली उपस्थिती लावली. राज्य मंत्रिमंडळाची बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडली असून त्यात काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
आज घेतलेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत राज्याचे हायड्रोजन धोरण जाहीर करण्यात आले असून महाराष्ट्र हे धोरण जाहीर करणारे पहिले राज्य ठरले आहे. तसेच मराठा, कुणबी विद्यार्थ्यांना परदेशी उच्च शिक्षण घेण्यासाठी 'सयाजीराव गायकवाड -सारथी शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय घेतला. अनेक दिवसांपासून हा निर्णय प्रलंबित असून आज त्यावर निर्णय घेण्यात आला.
दिंडोरी तालुक्यात चिमणपाडा आणि त्र्यम्बक तालुक्यात कळमुस्तेतील प्रवाही वळण योजनेला मान्यता देण्यात आली. नागपूर येथील मे.शिवराज फाईन आर्ट लिथो वर्क्सच्या कर्मचाऱ्यांना शासन सेवेत सामावून घेण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला. सेवानिवृत्त मुख्य न्यायमूर्ती, न्यायमूर्ती किंवा त्यांचे पती, पत्नी यांना सेवानिवृत्तीनंतरचे लाभ देण्यासंबंधीचा लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला. सोबतच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली, गेळे आणि चौकुळ येथील कबूलायतदार गावकर जमिनीबाबत निर्णय घेण्याय आला. नागपूर कृषि महाविद्यालय येथे आंतरराष्ट्रीय कृषि सुविधा केंद्र तयार होणार आहे.