Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सर्व डॉक्टरांच्या वैद्यकीय व अन्य कोणत्याही कारणास्तव घेतलेल्या सुट्या रद्द

सर्व डॉक्टरांच्या वैद्यकीय व अन्य कोणत्याही कारणास्तव घेतलेल्या सुट्या रद्द
, गुरूवार, 1 एप्रिल 2021 (07:54 IST)
महाराष्ट्रात नागपूरमध्ये बाधितांच्या मृत्यूचा दर अधिक आहे. तसेच बाहेरून येणाऱ्या रुग्णाला तातडीने बेड उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे तातडीने बेडची संख्या वाढविण्यात यावी, सर्व डॉक्टरांच्या वैद्यकीय व अन्य कोणत्याही कारणास्तव घेतलेल्या सुट्या रद्द करण्यात याव्या. आलेल्या रुग्णाला ताटकळत न ठेवता तातडीने वैद्यकीय मदत दिली गेली पाहिजे, असे स्पष्ट निर्देश ऊर्जामंत्री तथा पालकमंत्री नितीन राऊत यांनी बुधवारी दिले. सर्वपक्षीय कोविड आढावा बैठकीनंतर पालकमंत्री नितीन राऊत यांनी अ‍ॅलेक्सिस हॉस्पिटल, इंदिरा गांधी वैद्यकीय शासकीय रुग्णालय (मेयो), वैद्यकीय शासकीय महाविद्यालय (मेडिकल) रुग्णालयात प्रत्यक्ष जाऊन अधिष्ठात्यांसह रुग्णालय व्यवस्थापनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. तिन्ही हॉस्पिटलमधील प्रत्यक्ष पाहणी केली. 
 
लोकप्रतिनिधी व सामान्य नागरिकांकडून या आणीबाणीच्या काळामध्ये वैद्यकीय व्यवस्थेबाबत येणाऱ्या तक्रारीमधील अनेक बाबी वैद्यकीय व्यवस्थेवरील ताण म्हणून समजून घेता येतील. मात्र येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला परिसरात आल्यानंतर तातडीने उपचार मिळाले पाहिजे. त्यासाठी कोणतेही कारण पुढे करू नये, असे स्पष्ट आदेश त्यांनी दिले. 
 
रुग्ण आल्यानंतर बेड उपलब्ध नसल्यामुळे उशिरा वैद्यकीय उपचार सुरू झाला, अशा काही तक्रारी आल्या आहेत. न्यायालयाच्या निर्देशानंतर मेडिकल कॉलेजमध्ये बेसमेंटमध्येदेखील वैद्यकीय सुविधा पुरविण्याची सुरुवात झाली आहे. राज्य शासनाने वैद्यकीय वापरासाठी ८० टक्के ऑक्सिजन पुरवठा बंधनकारक केला आहे. आरोग्य विभागाने यासंदर्भातील अधिसूचना काढली आहे. नागपूरमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा करताना या सूचनेचे पालन होत आहे. त्यामुळे आता ऑक्सिजनची कमतरता नाही. असे असताना संपूर्ण महाराष्ट्रात मृत्यूसंख्या नागपुरात अधिक असणे, हे योग्य नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

‘सनराईज’ला रुग्णालयासाठी पुन्हा परवानगी देणार नाही