Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

CBIची नाशकात पुन्हा मोठी कारवाई; लष्कराचा मेजर आणि इंजिनिअर लाच घेताना ताब्यात

Bribe
, शुक्रवार, 14 ऑक्टोबर 2022 (07:54 IST)
नाशिक  – केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय)ने नाशकात पुन्हा मोठी कारवाई केली आहे. गेल्या कारवाईत सीबीआयने वस्तू आणि सेवा कर कार्यालयातील कर्मचाऱ्यांला लाच घेताना ताब्यात घेतले होते. आता सीबीआच्या हाती मोठे मासे गळाला लागले आहेत. नाशिकमधील लष्कराच्या मेजरसह एका इंजिनिअरला सीबीआयच्या पथकाने लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे.
 
नाशिकमध्ये लष्कराच्या हवाई प्रशिक्षणाचे केंद्र (कॅट) कार्यरत आहे. याठिकाणी लष्कराच्या हेलिकॉप्टर्सचे प्रशिक्षण दिले जाते. हे भारतातील एकमेव मोठे केंद्र आहे. विशेष म्हणजे, याच केंद्राला प्रेसिडेंट कलर हा सर्वोच्च सन्मानही मिळाला आहे. आणि याच केंद्रात सीबीआयचे पथकाने मोठी कारवाई केली आहे. कॅटमध्ये कार्यरत असलेला मेजर हिमांशू मिश्रा आणि ज्युनिअर इंजिनिअर मिलिंद वाडिले हे दोन्ही एका कामासाठी कंत्राटदाराकडून लाच मागत असल्याची तक्रार सीबीआयला प्राप्त झाली. त्यानंतर सीबआयच्या पथकाने सापळा रचला. आणि या सापळ्यात हे दोघे सापडल्याचे सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक रणजित पांडे यांनी इंडिया दर्पणशी बोलताना दिली आहे.
 
सीबीआयच्या या कारवाईमुळे केवळ कॅटच नाही तर संपूर्ण लष्करामध्येच खळबळ उडाली आहे. लष्करात लाचखोरीची फारशी कारवाई होत नाही. त्यातच या कारवाईत मेजर दर्जाचा अधिकारीच सापडल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे. तसेच, ही लाच किती रुपयांची होती, कशासाठी घेतली जात होती यासह अन्य बाबी अद्याप उघड झालेल्या नाहीत. सीबीआयचे पथक अद्याप कॅटच्या आवारातच असून दोघांसह अन्य बाबींची कसून चौकशी सुरू आहे. लवकरच या प्रकरणातील अधिक बाबी उजेडात येणार असल्याचे सांगितले जात आहे.

Edited by : Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

ऋतुजा लटके आज सकाळी निवडणूक अर्ज भरणार