शेतकरी प्रश्नांबाबत केंद्र सरकारला स्वारस्य राहिलेले नाही. आठ-दहा वेळा झालेल्या सर्व चर्चा निष्फळ ठरल्या आहेत. हा एकप्रकारे शेतकऱ्यांचा अपमान आहे. शेतकरी लाखाचा पोशिंदा आहे. त्याच्याबाबत केंद्र सरकारचे वर्तन दुर्दैवी आहे. त्यामुळे केंद्राचा निषेध करतो, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्र सरकारवर टिका केली. बारामती येथील अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या वतीने पासून कृषि तंत्रज्ञान सप्ताह आयोजित केला आहे. या कार्यक्रमानंतर उपमुख्यमंत्री पवार माध्यमांशी बोलत होते.
ते पुढे म्हणाले, दिल्ली येथे सुरू असलेल्या आंदोलनामध्ये आम्ही देखील सहभागी होणार आहोत. तसे पक्षाचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे. या आंदोलनाला महाविकास अघाडीमधील तिनही पक्षांनी पाठिंबा दिलेला आहे. आंदोलनात सहभाग नोंदवत असताना मुंबईमध्ये गर्दी करण्यापेक्षा प्रत्येकाने आपआपल्या तालुका व जिल्ह्याच्या ठिकाणी आंदोलन कारवीत. तर ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीमधील पक्षांना यश मिळाले आहे. कार्यक्रमा दरम्यान आमदार रोहित पवार यांनी माजी मंत्री राम शिंदे यांच्या गावात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पॅनेलचा विजय झाल्याचे सांगितले, असे उपमुख्यमंत्री पवार यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.