शेतकऱ्यांच्या वीज प्रश्नाच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून आता अधिक आक्रमक भूमिका घेण्यात आली आहे. ४ मार्च रोजी राज्यातील शेतकऱ्यांच्या वतीने ग्रामीण भागात राज्यभर चक्का जाम आंदोलन केले जाणार असल्याची घोषणा संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी कोल्हापूर येथे केली.
“शेतीला दिवसा १० तास वीज द्या या मागणीसाठी मागील ९ दिवसांपासून महावितरणच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरु आहे. अद्याप महावितरणला जाग आली नाही. आंदोलनाचा दुसरा टप्पा ४ मार्चपासून सुरू होत आहे. राज्यातील ग्रामीण भागात रास्ता रोको करण्यात येणार आहे. यामधून सरकारने तोडगा नाही काढला तर आंदोलन व्यापक होईल.”, असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे.
ऊर्जामंत्री नितिन राऊत यांचा आजचं दुरध्वनीद्वारे संपर्क झाला. चर्चा का करत नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. आंदोलन सुरू ठेवून चर्चा करण्याची तयारी जिल्ह्यातील मंत्र्यांना कळवली होती. त्यांनी ऊर्जामंत्र्यांना काय सांगितले हे माहिती नाही. सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलनाचा भडका उडेल, असेही त्यांना सांगितले आहे.” अशी माहिती शेट्टी यांनी दिली.