अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांना वांद्रे न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. म्हणजेच, 29 एप्रिल 2022 पर्यंत राणा दाम्पत्याला न्यायालयीन कोठडीत राहावं लागणार आहे.
तसंच, राणा दाम्पत्यावर 124-A कलमाअंतर्गत कारवाई करण्यात आल्याचं सरकारी वकील प्रदीप घरत यांनी सांगितलं.
राणा दाम्पत्याच्या जामिनासंदर्भात 29 एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे. जामीन मिळेपर्यंत नवनीत राणा भायखळा तुरुंगात तर रवी राणा ऑर्थर रोड तुरुंगात असणार आहेत.
या आठवड्यात राणा दाम्पत्य कधीही जामिनासाठी अर्ज करू शकतात. सेशन कोर्टात जामिनासाठी त्यांना अर्ज करता येईल.
राणा दाम्पत्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, विरोधकांकडून टीका केली जात आहे. बीबीसी मराठीनं सरकारी वकील प्रदीप घरत यांच्याशी बातचित करून, राणा दाम्पत्यावर नेमकं राजद्रोहाचा गुन्हा दाखल का करण्यात आला, हे जाणून घेतलं.
अॅड. प्रदीप घरत यांनी राणा दाम्पत्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल होण्याची चार कारणं बीबीसी मराठीसोबत बोलताना सांगितली.
1) 124-अ म्हणजे राजद्रोह. पण शासन व्यवस्था कोलमडून पडावी, यासाठी प्रयत्न करणं आणि शासन व्यवस्थेला आव्हान दिलं तरी सुद्धा हे कलम लागू होतं.
2) नवनीत राणा आणि रवी राणा यांनी नोटीस देऊनही आपला अट्टाहास सोडला नाही म्हणून हे कलम लागू केलं आहे.
3) हनुमान चालिसा किती पवित्र आहे आणि आम्ही हे करत होतो तर बिघडलं कुठे, यावर कोर्टात मोठा युक्तिवाद झाला. पण हनुमान चालीसा पठण करण्यासाठी घराच्या मालकाने परवानगी नाकारली होती. तुम्ही जबरदस्ती कुणाच्या घरी घुसून हनुमान चालीसा पठण करू शकत नाही.
हे घर मुख्यमंत्र्यांचं आहे, पक्षाच्या प्रमुखाचं आहे. तुम्ही तिथे गेलात तर कायद्याचा प्रश्न निर्माण होईल याची तुम्हाला कल्पना होती तरीही तुम्ही तिथे गेला. याचा अर्थ तुमचा हेतू प्रामाणिक नाही. तुम्हाला शासनाला कोंडीत पकडायचं आहे.
4) मुख्यमंत्री आणि पंतप्रधान अशा पदांवर दगड जरी बसला तरी तुम्हाला आक्षेपार्ह भाषा वापरता येत नाही, असं सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं आहे.
राजद्रोहाचा गुन्हा दाखल झाल्यानं पुढे काय होईल?
राजद्रोहाचा गुन्हा दाखल झाल्यानं राणा दाम्पत्याला कुठल्या शिक्षेला सामोरं जावं लागेल किंवा यापुढे काय होईल, याबाबत बोलातना सरकारी वकील अॅड. प्रदीप घरत म्हणाले की, "124-अ अंतर्गत 3 वर्षं कारावास ते जन्मठेपेपर्यंतची शिक्षा होऊ शकते. त्यांनी आता मॅजिस्ट्रेट कोर्टात जामीन अर्ज दिला आहे. तो त्यांचा अधिकार आहे."
तसंच, "29 एप्रिलपर्यंत राणा दाम्पत्याला तुरुंगातच रहावं लागेल, दुसरा पर्याय त्यांच्याकडे नाही. कारण 124-अ लागू असल्याने सेशन कोर्टातून जामीन मिळतो," असंही अॅड. प्रदीप घरत म्हणाले.
कालपासून नेमकं काय घडलं?
काल संध्याकाळी साडेपाच वाजता राणा दाम्पत्य त्यांच्या घरातून बाहेर पडले. त्यावेळेसही शिवसैनिकांनी आपली घोषणाबाजी सुरू ठेवली होती. काही मिनिटांच्या चर्चेनंतर नवनीत राणा यांना गाडीत बसवण्यात आले.
यावेळेस अत्यंत नाट्यमय वातावरण तयार झाले असताना राणा दाम्पत्यानेही शिवसैनिकांच्या दिशेने पाहून काही उद्गार काढले. यावेळेस त्या अत्यंत संतापलेल्या दिसत होत्या. अखेर प्रचंड घोषणाबाजीमध्ये दोघांनाही दोन वेगवेगळ्या गाड्यांमधून परिसरातून बाहेर काढण्यात आलं.
खार पोलीस ठाण्यात आक्रमक पवित्रा
राणा दाम्पत्याला खार पोलीस ठाण्यात नेण्यात आल्यावरही दोन्ही राणा यांनी आपली आक्रमक भूमिका दाखवली. यावेळेस त्यांनी अत्यंत संतप्त होत सरकारचा निषेधही केला. राणा दाम्पत्य खार पोलीस ठाण्यात गेल्यावरही वरुण सरदेसाई यांच्या नेतृत्वाखाली खारमध्ये घोषणा देत राहिले.
राणा दाम्पत्याला पोलीस ठाण्यात नेल्यावर भाजपाच्या नेत्यांनी सरकारवर टीका केली. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारवर टीका केली. सरकारने पोलिसांच्या बळाचा गैरवापर केल्याचं मत या दोघांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.
'हे एखाद्या जुलमी राजवटीनुसार सुरू आहे, पोलिसांनी त्यांना पोलीस ठाण्यात नेण्याची काहीच गरज नव्हती. सरकार लोकप्रतिनिधींची मुस्कटदाबी करतेय. राणांना कोणतंही कारण नसताना अटक केली आहे. शिवसेनेच्या नेत्यांनी चिथावणीखोर वक्तव्यं केली आहेत त्यांना पण अटक करणार का? एवढा अहंकार महाराष्ट्रातल्या लोकांनी कधीच पाहिला नाही.', असं दरेकर यावेळेस म्हणाले.
काल दुपारी काय काय झालं?
राणा यांनी आपलं आंदोलन मागे घेतल्यावरही शिवसैनिकांनी राणा यांच्या खार निवासस्थानाजवळची गर्दी कमी केली नाही. जोपर्यंत राणा दाम्पत्य माफी घेत नाही तोपर्यंत आम्ही जाणार नाही अशी भूमिका शिवसैनिकांनी घेतली. राणा यांना घरातून बाहेर काढण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त आणि अधिकारी या परिसरात दाखल झाले होते.
पोलीस अधिकाऱ्यांनी शिवसैनिकांना गर्दी कमी करण्याची विनंतीही केली. महिला शिवसैनिकांना रोखण्यासाठी आणि राणा यांना घराबाहेर जाण्या वाट करुन देण्यासाठी महिला पोलिसांचीही मोठी कुमक या परिसरात दाखल झाली होती.
युवासेनेचे नेते वरुण सरदेसाई यांनी शिवसैनिकांना शांत राहून कायदा सुव्यवस्था राखण्याचं आवाहन केलं. पोलीस राणा दाम्पत्याला पोलीस चौकीत घेऊन जाणार आहेत, त्यावेळेस कोणत्याही प्रकारे कायदा हातात घेऊ नये अशी विनंती त्यांनी शिवसैनिकांना केली.